नामांतर केलेल्या दोन्ही शहरावरून महायुतीचा पेच कायम; शिंदे गट ठाम, भाजपही मागे हटेना
By बापू सोळुंके | Published: March 29, 2024 06:17 PM2024-03-29T18:17:13+5:302024-03-29T18:21:15+5:30
शिंदे गट शिवसेनेच्या यादीतही छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जागेचा सस्पेन्स कायम
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुरुवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत मराठवाड्यातील केवळ हिंगोली मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम राहिला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून दावा सांगितला जात आहे. यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गट शिवसेनेला मिळेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपनेदेखील अद्याप मैदान सोडले नसल्याचे शिंदे गटाच्या आजच्या यादीतून दिसून येते. त्यांनी उस्मानाबाद आणि औरंगाबादचे उमेदवार जाहीर केलेले नाही.
शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना एक-दोन दिवसांत शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि त्यात औरंगाबादच्या उमेदवाराचा समावेश असेल, असे सांगितले होते. मात्र तसे झाले नाही. शिंदे गटाचे तीन आमदार मतदारसंघात असतानाही पहिल्या यादीत औरंगाबादचा समावेश न करण्यामागे महत्त्वाचे कारण असू शकते, अशी चर्चा आहे. या जागेसाठी भाजपनेही जोर लावला असून, शेवटच्या क्षणी हा मतदारसंघ आम्हाला सुटेल, असा दावा पक्षातील नेते करत आहेत.
नामांतर केलेलेच अडले !
महायुती सरकारने अलीकडेच उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले. मात्र, या दोन ठिकाणीच महायुतीचे घोडे अडले आहे. शिवाय, या दोन्ही शहरांचे नामांतर झाले असले तरी मतदारसंघाचे नाव मात्र पूर्वीचेच राहाणार आहे.
...तरच भाजपला संधी !
उस्मानाबादबाबत काय निर्णय होतो, यावरही बरेच अवलंबून आहे. उस्मानाबादची जागा शिंदे गटाकडे अथवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली तरच औरंगाबादची जागा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.