मुक्त विद्यापीठाचा गोंधळ; विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ
By Admin | Published: November 17, 2016 12:57 AM2016-11-17T00:57:19+5:302016-11-17T00:57:18+5:30
लातूर अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.
बाळासाहेब जाधव लातूर
अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यामुळे लातूर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. परंतु, विद्यापीठ कर्मचाऱ्यांमधील समन्वयाअभावी अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे.
‘ज्ञानगंगा घरोघरी’ या उक्तीनुसार अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरवून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून गेल्या अनेक दिवसांपासून केला जात आहे. यामध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. एम.एस्सी., पत्रकारिता पदवी तसेच अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम लातूर शहरातील ६ केंद्रांवरून तसेच ग्रामीण भागातील केंद्रांवरून चालविले जातात. यामुळे अर्धवट शिक्षण झालेले व डी.एड्., बी.एड्.चे विद्यार्थी उर्वरित शिक्षणासाठी या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. परंतु, यावर्षी मात्र विद्यापीठ, परीक्षा नियंत्रण विभाग व उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविणारी खाजगी कंपनी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील केंद्रावर बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा दिलेल्या ज्ञानेश्वर साळुंके याने परीक्षा देऊनही त्याची विद्यापीठाने गैरहजेरी दाखविली. तर शाहू महाविद्यालयातील प्रशांत सोपानराव मोरतळे या विद्यार्थ्याने बी.लिब अभ्यासक्रमाअंतर्गत लायब्ररी कॅटलॉगिंग या विषयाची परीक्षा दिली. मात्र आॅनलाईन निकालामध्ये त्यालाही गैरहजर दाखविण्यात आले आहे. परीक्षा देऊनही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया गेले आहे.
याबाबत विद्यार्थ्यांनी कागदोपत्री पाठपुरावा करूनही विद्यापीठाकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.