६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 04:01 PM2019-04-16T16:01:51+5:302019-04-16T16:03:40+5:30
काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार
औरंगाबाद : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना ७२ हजार रुपये देण्याच्या आणि कलम १२४ (अ)१ रद्द करण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. सोमवारी गजानन महाराज मंदिर चौकातील जाहीर सभेत काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार घेत त्यांनी पंजोबा, आजी, आई आणि नातू (काँग्रेस अध्यक्ष खा.राहुल गांधी) हे एकच घोषणा वारंवार करीत आहेत. ६० वर्षांपासून ते व काँग्रेस एकच नारा देत आहेत, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. उमेदवार खैरे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, आ.प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून १ रुपया जर खाली सोडला तर ८५ पैसे दलाल खातात. मोदींनी ही सगळी खाबूगिरी बंद केली आहे. ते गरिबी हटविण्यासाठी काम करीत आहेत. मोदींनी काळा पैसा आणायचा आणि तो काँगे्रसने ७२ हजार रुपये देऊन वाटायचा, असे ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी ‘खुद खाऊंगा ना दुसरों को खाने दुंगा’ याप्रमाणे काम करीत ३४ कोटी गरिबांना जन-धन योजनेत बँकखाते दिले. खात्यावर ८० हजार कोटी रुपये दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी शाहनवाज, आ. सावे, आ. शिरसाट यांची भाषणे झाली.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
स्मार्ट सिटीचा दर्जा या शहराला दिला. १२५ कोटी यापूर्वी शहरातील रस्त्यासाठी दिले आहेत. आजवर एवढा निधी कधी तरी औरंगाबाद शहराला मिळाला काय, येथील रस्ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत निधी देत राहू. पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जेवढा लागेल तेवढा निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभेत दिले. जालना-औरंगाबाद इंडस्ट्रियल हब होणार असल्याचे ते म्हणाले.
‘तो’ अपक्ष अफवा पसरवतोय
उमेदवार खा.खैरे यांनी अपक्ष उमेदवार (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) आणि एमआयएमचे उमेदवार आ.इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले. मला निवडून द्या, मी भाजपला पाठिंबा देईल असे म्हणून एक अपक्ष उमेदवार अफवा पसरवतोय. तो त्याच्या घरच्यांचा नाही, इतरांचा काय होणार. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्याचे सांगून ते म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम लटकले; परंतु येत्या एक वर्षात ते काम पूर्ण करू.