विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 04:13 PM2019-07-31T16:13:40+5:302019-07-31T16:15:24+5:30
सुभाष झांबड यांना पुन्हा संधी नाही
औरंगाबाद : विधान परिषदेच्याऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याची माहिती मात्र समोर आली नाही. या मतदारसंघाचे विद्यमान आ. सुभाष झांबड यांचा काँग्रेसने यावेळी पत्ता कट केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे, तर विनोद पाटील यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आहे. दरम्यान आ. झांबड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शिवसेना-भाजप युतीकडून अंबादास दानवे हे उमेदवार असतील हे मागेच स्पष्ट झाले आहे. अधिकृत घोषणा पक्षाने केली नसली तरी तेच उमेदवार असतील. सेनेकडून उमेदवार जाहीर झाल्यामुळे काँग्रेसकडून कोण? यावरून चर्चा सुरू होत्या. विद्यमान आ. झांबड हेच उमेदवार असतील असे वाटत होते; परंतु कुलकर्णी यांनी यावेळी उमेदवारी पदरात पाडून घेतली. सध्या दानवे विरुद्ध कुलकर्णी अशी लढत होणार असल्याचे दिसत असले तरी येणाऱ्या दोन दिवसांत चौथा उमेदवार निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार उमेदवारांमध्ये लढत झाली तर पसंती क्रमाच्या मतांमुळे युतीकडे बहुमत असतानाही विजयाचे गणित बदलून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथून मागे असेच निकाल लागलेले आहेत. चौथा उमेदवार तयार करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. हा उमेदवार कोण असेल, हे १ तारखेपर्यंत स्पष्ट होईल. विनोद पाटील यांनी निवडणूक मैदानातून माघार घेतली आहे. सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी तलवार म्यान केली आहे. त्यामुळे चौथा उमेदवार कोण याकडे आता डोळे लागले आहेत.
शिवस्वराज्य बहुजन पक्षाचा अर्ज
कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे विशाल नांदरकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेत शिवसेनेला जाधव यांनी जेरीस आणले होते. दरम्यान आ. जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत मला माहिती नाही; परंतु अर्ज दाखल केला असेल तर चांगलीच बाब आहे.