काँग्रेसमध्ये प्रती संघटना नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 12:17 AM2016-09-24T00:17:06+5:302016-09-24T00:19:22+5:30
औरंगाबाद : काँग्रेस पक्ष ही आपली आई आहे. आपण आपल्या आईवर जसे प्रेम करतो, तसेच प्रेम पक्षावरही केले पाहिजे.
औरंगाबाद : काँग्रेस पक्ष ही आपली आई आहे. आपण आपल्या आईवर जसे प्रेम करतो, तसेच प्रेम पक्षावरही केले पाहिजे. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जर कोणी संघटना स्थापन करीत असेल, तर ती राक्षसी प्रवृत्ती म्हणावी लागेल. अशा प्रवृत्तीवर कारवाई करण्यास मी मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी दिला.
अनुदानित वसतिगृह चालकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या दालनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाजकल्याण अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आ. अब्दुल सत्तार जिल्हा परिषदेत आले होते. त्यावेळी पत्रकारांनी आ. सुभाष झांबड यांनी स्थापन केलेल्या जनविकास आंदोलन विकास समितीकडे आ. अब्दुल सत्तार यांचे लक्ष वेधले. तेव्हा ते म्हणाले की, मी दोन दिवस कोकण दौऱ्यावर होतो. त्यामुळे मला याची कल्पना नव्हती. इथे आल्यानंतर हा प्रकार समजला. काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रती संघटना, समित्या काढता येणार नाहीत. कार्यकर्त्यांना पक्षाचेच काम करावे लागेल. पक्षनिष्ठा नसेल, तर त्या कार्यकर्त्यांना पक्षात राहण्याचा अधिकारच नाही. पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करणारांची गय केली जाणार नाही. यासंबंधीचा अहवाल आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविणार आहे. यासंदर्भात तेच कारवाई करतील. प्रदेशाध्यक्षांनी जर मला अधिकार दिले, तर मी पक्षातून काढून टाकण्यासही मागेपुढे बघणार नाही.
पूर्वीचे सरकार एका आमदाराला रस्त्याच्या कामासाठी ७०० कोटी रुपयांचे अनुदान देत होते. मला या दोन वर्षांत अवघे सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यातून किती रस्ते दुरुस्त होतील. केंद्रातील तसेच राज्यातील सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी एकाची तरी पूर्तता केली आहे का. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी तर तहसीलदारांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे, हे विरोधी पक्ष म्हणून आमचे कर्तव्य आहे. सरकारविरुद्ध सर्वत्र आक्रोश आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुका आम्ही बहुमताने जिंकणार, असा दावाही आ. सत्तार यांनी केला.
केवळ जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीच
यासंदर्भात आ. सुभाष झांबड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, पक्षाचा आदेश असेल तर मी स्थापन केलेली समिती बंद करून टाकतो. मुळात या समितीपासून राजकीय फायदा व्हावा, हा आपला हेतू नव्हता. जनतेचे प्रश्न, समस्या सुटत नाहीत.
ते सोडविण्यासाठी जनविकास आंदोलन समितीची आपण स्थापना केली होती. समिती स्थापन केली म्हणजे पक्षविरोधी कारवाई केली, असे कसे म्हणता येईल. तरी सुद्धा पक्षश्रेष्ठींचे आदेश असतील, तर ती समिती बंद करून टाकू.
आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, दहा दिवसांच्या आत विभागीय आयुक्त कार्यालयावर काँग्रेसच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ हजार लोक या मोर्चात सहभागी होतील. त्यानंतर हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा नेला जाईल. हा मोर्चा राजकारणाचा भाग नसेल. तो जनतेच्या समस्या व सरकारचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर मांडण्यासाठी असणार आहे. शहर व ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा असेल.