जिल्ह्यात काँग्रेसचा उंचावता आलेख
By Admin | Published: September 29, 2014 12:59 AM2014-09-29T00:59:37+5:302014-09-29T01:00:29+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील मागील चार विधानसभा निवडणुकांचा मागोवा घेतला असता काँग्रेसचा आलेख उंचावता असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील मागील चार विधानसभा निवडणुकांचा मागोवा घेतला असता काँग्रेसचा आलेख उंचावता असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेची प्रगती स्थिर असून, भाजपाचा मात्र सफाया झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही गतनिवडणुकीत खाते उघडले आहे.
२००९ च्या आधी १९८० पासून जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ नंतर जिल्ह्यात नऊ मतदारसंघ अस्तित्वात आले. १९९५ सालच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार निवडून आले. वैजापूर आणि कन्नड या दोन जागा काँग्रेसकडे होत्या. सिल्लोड आणि औरंगाबाद पूर्व या जागा भाजपाने जिंकल्या. तर औरंगाबाद पश्चिम आणि पैठणमध्ये शिवसेनेने विजय मिळविला, तर गंगापूरमध्ये अपक्षाने बाजी मारली. राज्यात युतीची सत्ता आली तर जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाची समान शक्ती राहिली.
१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात दोन काँग्रेसविरुद्ध शिवसेना- भाजपा युती अशी लढत झाली. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांची आघाडी होऊन आघाडीची सत्ता आली. यावेळीही जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले. तर भाजपाने सिल्लोड आणि औरंगाबाद पूर्व या आपल्या दोन जागा कायम राखल्या. वैजापूर मतदारसंघ काँग्रेसने गमावला; परंतु औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ खेचून घेतला. वैजापूरसह गंगापूर आणि पैठण या तीन ठिकाणी विजय मिळविला.
२००४ साली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. यावेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७१ जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सिद्ध केले. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ शिवसेनेने जिंकले. वैजापूर, गंगापूर, पैठणसह कन्नडची जागा शिवसेनेने खेचली. तर काँग्रेसने कन्नडची जागा गमावून औरंगाबाद पूर्वची जागा जिंकली. भाजपाला केवळ सिल्लोडच्या जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीपासून जिल्ह्यात भाजपाची पीछेहाट सुरू झाली. तिन्ही निवडणुकांत काँग्रेस पक्ष स्थिर राहिला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नऊ मतदारसंघांपैकी २००९ मध्ये काँग्रेसने तीन जागा जिंकून आपला आलेख उंचावला. औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि सिल्लोड याठिकाणी विजय मिळविला. तर वैजापूर आणि औरंगाबाद पश्चिम या दोन जागा शिवसेनेला मिळाल्या. पैठणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली.
कन्नडची जागा मनसेच्या पदरात पडली, तर औरंगाबाद मध्य आणि गंगापूर मतदारसंघात अपक्षांनी बाजी मारली. या निवडणुकीत शिवसेनेला मात्र जोरदार फटका बसला. जिल्ह्यात दोन मतदारसंघ वाढले असताना शिवसेनेच्या आमदारांची संख्या चारवरून दोनवर आली, तर भाजपाचा पूर्ण सफाया झाला, तर काँग्रेसने तीन जागा मिळवीत वर्चस्व सिद्ध केले.