नोटाबंदीविरोधात काँग्रेसचा मोर्चा
By Admin | Published: January 6, 2017 11:57 PM2017-01-06T23:57:50+5:302017-01-06T23:58:58+5:30
उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला.
उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. प्रवेशद्वारात थांबलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास मज्जाव केली. त्यामुळे पोलिस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश न दिल्याने आंदोलकांनी इमारतीवर निवेदन डकविले. मोर्चेकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
नोटबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे असूनही त्यांना काढता येत नाहीत. शेतीमालाचे दरही प्रचंड कोसळले आहेत. दोन ते तीन रूपये किलो दराने टोमॅटो विकावे लागत आहेत. त्याचेही पैसे दहा ते पंधरा दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत नाहीत. असे असतानाही केंद्र सरकारकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. एकीकडे कॅशलेसच्या गोष्टी केल्या जात आहेत. परंतु, ग्रामीण भागात यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. दहा ते पंधरा गावांमध्ये मिळून बँकेची एखाददुसरी शाखा आहे. तेथेही ‘कॅश’चा तुटवडा आहे.
त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसह लहान व्यावसायिकांना दोन ते चार हजार रूपयांसाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एवढे करूनही वेळेत पैसे मिळतील याची शाश्वती नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अर्थव्यवस्थेच्या या सर्व दुरवस्थेला भाजपा सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा निर्णय जबाबदार असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाभरात आंदोलने केली.
दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हा मार्चा जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारात दाखल झाला. यावेळी गेटमध्ये थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना आतमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. त्यावर संतप्त झालेले कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. मोर्चेकऱ्यांची संतप्त भूमिका लक्षात घेऊन त्यांना आतमध्ये प्रवेश दिला. मोर्चेकरी जिल्हाधिकाऱ्यांना घेराओ घालण्यासाठी जात असतानाच त्यांना इमारतीच्या प्रवेशद्वारातच रोखण्यात आले. ‘तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाता येणार नाही’, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानंतर मोर्चेकरी अधिक संतप्त झाले. आणि त्यांनी जिल्हा कचेरीच्या आवारातच ठिय्या मांडला.
अधिकाऱ्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे, अशी त्यांनी भूमिका घेतली. परंतु, ते खाली न आल्याने शेवटी मोर्चेकऱ्यांनी इमारतीला निवेदन डकविले. यानंतरही परिस्थिती सुरळीत झाली नाही तर काँग्रेसच्या वतीने याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मोर्चामध्ये काँग्रेसचे पक्ष निरीक्षक तुकाराम रेंगे-पाटील, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. उस्मानाबादसोबतच जवळपास सर्वच तालुक्याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)