काँग्रेसची भाजपवर कुरघोडी; बाजार समितीत अशासकीय प्रशासक मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:04 AM2021-07-23T04:04:22+5:302021-07-23T04:04:22+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण अद्याप सुरूच असून, गुरुवारी शासनाने अशासकीय प्रशासक ...
औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण अद्याप सुरूच असून, गुरुवारी शासनाने अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले. जगन्नाथ काळे यांची या मंडळावर मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जगन्नाथ काळे हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांचे बंधू असून, ते व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आलेले आहेत.
अनेक दिवसांच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे म्हणाले, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सारे प्रशासक एकदिलाने काम करू, असा विश्वास नवनियुक्त मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केला.
प्रशासक मंडळ नेमू नये. नेमायचेच झाल्यास लोकनियुक्त संचालक मंडळास नेमावे, अशी मागणी करणारी आमची याचिका न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणीस येत आहे. त्याआधीच डॉ. कल्याण काळे यांनी घाई करून या प्रशासक मंडळाची नियुक्ती करून घेतली. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी व्यक्त केली. पठाडे हे आ. हरिभाऊ बागडे यांचे समर्थक आहेत. कोरोनामुळे मुदतवाढ न दिल्याचे प्रकरणही पठाडे यांनी न्यायालयात नेले होते.
शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या सहीचे पत्र जिल्हा उपिनबंधकांमार्फत प्राप्त होताच नव्या प्रशासक मंडळाने तातडीने सायंकाळीच आपला पदभार स्वीकारला.
चौकट...
...असे आहे प्रशासक मंडळ
मुख्य प्रशासक-जगन्नाथ काळे, सर्जेराव चव्हाण, शिवाजी ढाकणे, शेख मो. चांद ( सर्व काँग्रेसचे), शिवाजी गावंडे, मो. अबू मो. गयास बागवान, उदयराज पवार, कृष्णा उकिर्डे (सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे), मुरलीधर चौधरी, प्रकाश जाधव, गणेश नवले, अशोक शिंदे (सर्व शिवसेनेचे).