काँग्रेस-राष्ट्रवादीत तीन जागांवरून ‘घडी’ बसेना.!
By Admin | Published: February 4, 2017 12:50 AM2017-02-04T00:50:32+5:302017-02-04T00:51:18+5:30
जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली
जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातील तीन गटांवरून धूसफूस कायम असून, मंगळवारपूर्वी यावर दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून पावले न उचलली गेल्यास मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना आणि भाजपा यांची या निवडणुकीसाठी युती झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणे गरजेचे आहे, अशी धारणा दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांसह नेत्यांचीही होती. मात्र, जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठकाचे सत्र या भोवतीच आघाडी फिरत राहिली. अखेर मंगळवारी रात्री उशिरा आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ तर काँग्रेसला १८ जागा देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे तर. काँग्रेसने २० जागांची मागणी केली होती. या जागा वाटपानुसारच आघाडी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भावना समजून घ्यावी, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. एकूणच आघाडीत बिघाडी होऊ नये, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.