जिल्ह्यात पाच पं.स.वर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा
By Admin | Published: September 15, 2014 12:07 AM2014-09-15T00:07:58+5:302014-09-15T00:32:08+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत पाच पं.स.वर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने झेंडा फडकावला.
औरंगाबाद : जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत पाच पं.स.वर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने झेंडा फडकावला. उर्वरित ४ ठिकाणी मात्र वेगवेगळ्या आघाड्यांनी हे पद पटकावले. पैठणमध्ये अपेक्षेप्रमाणे ‘मनसे’ राज आले असून, गंगापुरात शिवसेनेने विजय मिळविला. कन्नडमध्ये मनसे-राष्ट्रवादी युतीने हातमिळवणी करून विजयश्री खेचली. तर सिल्लोडमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी केल्याचे दिसून आले. औरंगाबाद पं. स. वर काँग्रेसचा सभापती निवडून आला असून, अपक्ष गयाबाई ठोंबरे उपसभापती झाल्या आहेत.
खुलताबाद : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या फरजाना मझहर पटेल, तर उपसभापतीपदी अपक्ष दिनेश अंभोरे हे प्रत्येकी चार विरुद्ध दोन मतांनी विजयी झाले आहेत.
खुलताबाद पंचायत समिती सभागृहात काँग्रेस ३, शिवसेना २, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असून, गेल्या वेळेसचाच फार्म्युला यावेळी वापरत काँग्रेसने अपक्षांच्या मदतीने सत्ता कायम ठेवली आहे.
खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडीसाठी पं. स. सभागृहात पीठासीन अधिकारी स्वाती कारले यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. सभापतीपदासाठी काँग्रेसच्या फरजाना मझहर पटेल, तर शिवसेनेच्या कुसुमबाई प्रकाश मिसाळ दोन उमेदवार होते. यात फरजाना पटेल यांना चार तर कुसुम मिसाळ यांना दोन मते मिळाली. चार विरुद्ध दोन मतांनी काँग्रेसच्या फरजाना पटेल विजयी झाल्या.
उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष ( आ. प्रशांत बंब गट) दिनेश अंभोरे, शिवसेनेचे कृष्णा कुकलारे निवडणूक रिंगणात होते. अपक्ष आ. प्रशांत बंब गटाचे दिनेश अंभोरे हे ही चार विरुद्ध दोन मतांनी विजयी झाले.
या निवडणूक प्रक्रियेसाठी गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ, तहसीलदार बालाजी शेवाळे, नायब तहसीलदार प्रशांत काळे, वैशाली डोंगरजाळ, राजेश कांबळे, लक्ष्मीकांत बोरसे, अनिल गवळी यांनी परिश्रम घेतले.
खुलताबाद पंचायत समिती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे, जिल्हा बँकेचे संचालक किरण पा. डोणगावकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभाताई खोसरे, माजी सभापती अनिल श्रीखंडे, जि. प. सदस्या शोभाताई नलावडे, शहराध्यक्ष अब्दुल समद, आबेद जहागीरदार, सलीम कुरेशी, वसंतराव नलावडे, हाजी अकबर बेग, विजय भालेराव, अशोक जाधव, शेख अहेमद, हिरालाल राजपूत, युवराज नागे, भावराव काटकर, संजय भागवत, महेंद्रकुमार ठोळे, हाजी अल्लाऊद्दीन शेठ, साहेबराव पवार, तनवीर पटेल, संतोष राजपूत, संजय राजपूत, प्रकाश वाकळे, आशिष कुलकर्णी, दिलीप अंभोरे, अॅड. इश्तियाक पटेल, शेख रियाज, अब्बास बेग, गंगापूर-खुलताबाद युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष इम्रान पटेल, इलियास फ्रूटवाले, डी. डी. काळे आदींसह पदाधिकारी हजर होते.
अल्पसंख्याक समाजास प्रथमच पं. स. राजकारणात सभापतीपद
खुलताबाद पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रथमच अल्पसंख्याक मुस्लिम समाजास प्रतिनिधित्व मिळाले आहे. तालुक्यातील राजकारणात या समाजास आतापर्यंत सभापतीपद मिळाले नव्हते. फरजाना पटेल यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला सभापती होण्याचा मान मिळाला आहे. त्याचबरोबर बोडखा गावासही पहिल्यांदा सभापतीपद मिळाले असल्याने गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेस पक्षाने हा बहुमान आपल्याला दिला असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभापती फरजाना पटेल यांनी दिली.
सोयगाव : पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या विद्यमान सभापती नंदा आगे यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपसभापतीपदासाठी काँग्रेस व भाजपाने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापतीपदासाठी काँग्रेसतर्फे नंदा संजय आगे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची पुन्हा दुसऱ्यांदा सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपभापतीपदाकरिता भाजपातर्फे मगन जवाहरलाल यांनी, तर काँग्रेसतर्फे कमलाबाई पंडित शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चंद्रकांत अर्जुन पाटील यांनी, असे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील मगन जाधव आणि कमलाबाई शेळके यांनी माघार घेतली. उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचे सुपडू देवरे सूचक होते, तर भाजपाने माघार घेतली, त्यामुळे गेल्या वेळेस सेना-भाजपाला राष्ट्रवादीने केलेल्या सहकार्याची परतफेड त्यांनी यावेळी केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ काळे यांनी सांगितले, तर गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा उपसभापती होऊ शकला म्हणून यावेळी आम्ही राष्ट्रवादीला दिलेला शब्द पाळून सहकार्य केल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, भाजपा तालुकाप्रमुख शिवाजी बुढाळ यांनी सांगितले.
नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार, माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर काळे, जि.प. सदस्य श्रीराम महाजन, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष अक्षय काळे, महेश चौधरी, रमेश गव्हांडे आदींनी स्वागत केले.
वैजापूर : वैजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या द्वारका पवार यांची, तर उपसभापतीपदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे होते. या बैठकीत सभापतीपदासाठी द्वारका पवार व उपसभापतीपदासाठी सुभाष जाधव यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्या दोघांची सभापती व उपसभापतीपदी निवड झाल्याचे उबाळे यांनी जाहीर केले.
नवनिर्वाचित सभापती पवार व उपसभापती जाधव यांच्या निवडीबद्दल माजी आ. कैलास पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा विजया पाटील चिकटगावकर, माजी सभापती चंद्रकला शेळके, लहानूबाई डिके, बिजला साळुंके, विमल पवार आदींनी सत्कार केला. यावेळी जि.प. सदस्य दिनकर पवार, सूरज पवार, अॅड. प्रताप निंबाळकर, शिवाजी आधुडे, वाल्मीक बोढरे, द्रौपदाबाई तेझाड, सारंगधर डिके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एल.एम. पवार, अरुण शर्मा, साई मतसागर, रामचंद्र शेळके, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भोसले, प्रभाकर बारसे, उपनगराध्यक्ष संदीप टेके, मजीद कुरेशी आदी उपस्थित होते.
फुलंब्री : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी प्रदीप गाडेकर, तर उपसभापतीपदी काँग्रेसचे रऊफ मजीद कुरेशी यांची निवड झाली.
फुलंब्री पंचायत समितीत एकूण ८ सदस्य आहेत. यात काँग्रेस पक्षाचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३, तर शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. रविवारी सभापती व उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली. यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभापतीपदासाठी माधुरी गाडेकर यांनी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेकडून सरोजा काळे यांनी अर्ज भरला होता. यात माधुरी गाडेकर यांना सहा मते पडली, तर सरोजा काळे यांना दोन मते पडली. माधुरी गाडेकर दोन विरुद्ध सहा मतांनी विजयी झाल्या. उपसभापतीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून रऊफ कुरेशी यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात अर्ज नसल्याने ते बिनविरोध निवडून आले.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. डॉ. कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सभापती व उपसभापती यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन देशमुख, काँग्रेसचे सुदाम मते, बाजार समिती सभापती संदीप बोरसे, उपसभापती सुभाषराव गायकवाड, जगन्नाथ काळे, माजी जि.प. सदस्य जितेंद्र जैस्वाल, डॉ. सारंग गाडेकर, राहुल डकले, आनंदा ढोके, सुनीता भागवत, सुनीता जाधव, किशोर बलांडे, अजय पटेल, शेख रज्जाक, मजीदसेठ कुरेशी, इलियास पटेल, नजीर कुरेशी, आवेज पटेल, पंडित नागरे, विजय मोरे, इलियास शाह, सुदाम पवार, आरेफ पटेल, मोबीन शाह, वरुण पाथ्रीकर, अनिल बोरसे, मंगेश मेटे, जमीर पठाण, त्र्यंबक नागरे, पंढरीनाथ जाधव, देवीदास ढंगारे, बाळू शिंदे, सुरेश नागरे, ज्युसा पटेल, कलीम पटेल, लड्डू पठाण, मतीन पटेल, मुसा पटेल, कारभारी वहाटुळे उपस्थित होते.
पैठण : पैठण पंचायत समिती सभापतीपदी मनसेच्या पुष्पा रामनाथ केदारे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, अपक्षासोबत मनसेने आघाडी करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. पं. स. वर सभापती, उपसभापती मनसेचे झाले असल्याने प्रथमच पंचायत समितीवर मनसेचे राज्य आले आहे.
पंचायत समिती सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार, तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. सभापतीपद महिला एस.सी. प्रवर्गासाठी राखीव होते. या प्रवर्गातील एकमेव सदस्य मनसेकडे असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.
उपसभापतीपदासाठी मनसेचे कृष्णा गिधाने व शिवसेनेच्या ज्योती फासाटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. हीच निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. शिवसेनेकडे ७, काँग्रेस ३, अपक्ष २ व मनसेकडे ४ असे संख्याबळ आहे. मागील अडीच वर्षांत सेना व काँग्रेसने आघाडी करून पंचायत समितीची सत्ता काबीज केली होती. यंदा मात्र डॉ. सुनील शिंदे यांनी राजकीय खेळी करीत काँग्रेसला व अपक्षांना सोबत घेत शिवसेनेला धक्का दिला. मनसेच्या कृष्णा गिधाने यांना ९, तर ज्योती फासाटे यांना ७ मते मिळाली. विजयी उमेदवारांसह विजयी मिरवणूक काढण्यात आली.
सिल्लोड : ऐन विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेससोबत घरभेदी खेळी करीत भाजपासोबत पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लताबाई दादाराव वानखेडे यांची सभापतीपदी, तर भाजपाचे इद्रीस मुल्तानी यांची उपसभापतीपदी वर्णी लागली आहे.
सिल्लोड पंचायत समितीत १६ सदस्य आहेत. रविवारी पार पडलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती रमेश चिंचपुरे गैरहजर होते, त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला १५ सदस्य हजर राहिले. सभापतीपदासाठी लताबाई वानखेडे, माधवी कळात्रे, फुलाबाई भोपळे या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी भाजपाच्या फुलाबाई भोपळे यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वानखेडे व काँग्रेसच्या कळात्रे यांच्यात सरळ लढत झाली. यात लताबाई वानखेडे यांना १५ पैकी ८ तर कळात्रे यांना ७ मते मिळाली.
राष्ट्रवादीच्या वानखेडे या भाजपाच्या पाठिंब्याने सभापतीपदी विजयी झाल्या. उपसभापतीपदासाठी इद्रीस मुल्तानी, ठगन भागवत, विक्रांत दौड, किशोर गवळे या ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी ठगन भागवत, किशोर गवळे यांनी माघार घेतली. उपसभापतीपदासाठी इद्रीस मुल्तानी व विक्रांत दौड यांच्यात लढत झाली. मुल्तानी यांनी ८ मते घेत दौड यांचा पराभव केला.
या निकालावर प्रतिक्रिया देताना पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, काँग्रेसचे मतदान फुटलेले नाही. आमची मते आम्हाला मिळाली आहेत. जे फुटले ते आमचे नव्हतेच.
पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार राहुल गायकवाड, एस.जी. पैठणे, गटविकास अधिकारी मनोज चौधर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
कन्नड : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी मनसेचे खेमा धर्मू मधे हे बिनविरोध, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश रामभाऊ गाडेकर विजयी झाले.
सभापतीपद अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षित होते आणि खेमा मधे हे एकमेव सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचेच एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले.
उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गाडेकर व शिवसेनेच्या शोभाताई राजू राठोड यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. दुपारी दोन वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. सभापतीपदासाठी एकमेव नामनिर्देशनपत्र असल्याने सभापतीपदासाठी खेमा मधे यांची निवड झाल्याची घोषणा झाली. त्यानंतर उपसभापतीपदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यात प्रकाश गाडेकर यांना ११, तर शोभाताई राठोड यांना ३ मते मिळाली. १८ सदस्य असताना परसराम बोलकर, नामदेव राठोड, छायाबाई जैस्वाल व सीताराम नागोडे हे चार सदस्य गैरहजर राहिले.
पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजीव नंदकर, सहायक म्हणून तहसीलदार महेश सुधळकर, गटविकास अधिकारी के. एस. सानप यांची उपस्थिती होती.
गंगापूरचा गड सेनेने राखला
गंगापूर : पंचायत समिती सभापती व उपसभापतीपद अखेर शिवसेनेकडेच कायम राहिले. लासूर गणातील संजय जैस्वाल सभापती, तर सिद्धनाथ वाडगाव येथील वर्षा गंडे यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडली.
शिवसेनेतर्फे सभापतीपदासाठी संजय जैस्वाल यांनी व उपसभापतीपदासाठी वर्षा गंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर बंब गटाचे कृष्णा सुकाशे यांनी सभापती व उपसभापतीपदासाठी काँग्रेसचे बबनराव म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. १८ सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये १० सदस्य शिवसेनेचे असल्यामुळे या सदस्यांपैकी एकही सदस्य बाहेर गेला नसल्यामुळे शिवसेना एकसंघ व एकजिवाने होती, त्यामुळे हात उंचावून घेतलेल्या मतदानात शिवसेनेच्या सर्वच मतदारांनी संजय जैस्वाल यांच्या बाजूने मतदान केले. उपसभापतीपदासाठी वर्षा गंडे यांच्या बाजूनेदेखील शिवसेनेच्या सर्वच सदस्यांनी मतदान केले. आघाडीचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने त्यांची मतदारसंख्या ७ वर येऊन ठेपली, शिवाय अपेक्षेप्रमाणे काही बदल झालाच नसल्याने कृष्णा सुकाशे व म्हस्के यांना प्रत्येकी ७ मते मिळाली.