काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी जाहीर...!
By Admin | Published: January 31, 2017 11:36 PM2017-01-31T23:36:09+5:302017-01-31T23:38:42+5:30
जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली
जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला ३८, तर काँग्रेसला १८ जागा देण्यावर दोन्ही पक्षांतील नेत्यांचे एकमत झाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहेत. मतविभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आघाडी करण्याबाबत अनेक बैठका झाल्या. घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्यातील काही जागांवर मतभेद होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भावनेतून पूर्वीपेक्षा जागा वाढवून देण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून झाली. त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बराच खल झाला. सोमवारी यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. जागा वाटपावर चर्चा होऊन काँग्रेसला १८ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ जागा देण्यावर एकमत झाले. निवडून येण्याची क्षमता गृहित धरुनच जागांचा आग्रह धरल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. तर काँग्रेसची ताकद ग्रामीण भागात वाढली असून, यंदा पूर्वीपेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला
आहे. (प्रतिनिधी)