काँग्रेसला हवाय कार्यकर्त्यांचा ‘हात’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:06 AM2017-09-07T01:06:45+5:302017-09-07T01:06:45+5:30
काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत गटतट आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम असून, त्यांच्यात चैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने पक्ष कार्य सुरु करण्याचे आव्हान नेत्यांपुढे असणार आहे.
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यातील विविध सत्ता केंदे्र काबीज करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. सत्तेच्या सारीपाटात एकीकडे भाजप आक्रमक, तर काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत गटतट आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम असून, त्यांच्यात चैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने पक्ष कार्य सुरु करण्याचे आव्हान नेत्यांपुढे असणार आहे. तरच आगामी ग्रामपंचायत निवडणुकांत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यात भाजपने आक्रमकपणे सत्ता राबविण्यास सुरुवात केली. अनेक सत्ताकेंद्रांत चंचूप्रवेश करुन सत्ता मिळविण्यापर्यंत प्रयत्न झाला. जनाधार वाढविण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची विरोधकाची भूमिका आंदोलनांपुरतीच मर्यादित राहिली. काँग्रेसमध्ये नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी झाल्याने निवडणूक कुणाच्या जिवावर लढवायच्या हाच प्रश्न सर्वांना भेडसावतो आहे. मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्यावर भर राहिला. त्यामुळे नऊ जागांवर बिनविरोध निवडणुक झाली. पण, उर्वरित जागांवर सहमती न झाल्याने नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनलच टाकले नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने बाजी मारली. भाजप नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्या सोयीनुसार जागा निवडून आणल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. विरोधकच हा खºया अर्थाने सत्ताधारी असतो. तोच सत्ताधाºयांवर अंकुश ठेवण्याचे काम करीत असतो. पण दुर्दैवाने हे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत नाही.
जिल्ह्यात जालना, परतूर आणि भोकरदन या नगर पालिकांवर काँग्रेसची सत्ता असून, जिल्हा परिषदेतही काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. मात्र, ही सत्ता ठराविक व्यक्तींभोवतीच फिरत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. उघडपणे कुणीही बोलत नसले तरी खाजगीमध्ये अनेकजण आपल्या व्यथा मांडतात. आपली भावना मोकळेपणाने मांडावी असा जिल्ह्यात एकही नेता या कार्यकर्त्यांना जवळचा वाटत नाही, हे पक्षाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. केवळ पक्ष एके पक्ष असे मानून कार्य करणाºया सामान्य कार्यकर्त्यांत नैराश्याचे वातावरण आहे. त्यांच्यात चैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने राजकीय संघर्ष सुरू करावा लागणार आहे. अन्यथा जिल्ह्यात काँग्रेसला लाभलेली समृद्ध परंपरा खंडित होण्यास वेळ लागणार नाही.
पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालावे
मध्यंतरी जालना पालिकेत सत्ता असलेल्या काँग्रेसविरूद्ध भाजपने रणशिंग फुंकत आंदोलन केले होते. याला काँग्रेसकडून तेवढ्याच गंभीरतेने ठोस प्रत्युत्तरच देण्यात आले नाही. यात पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातले असते तर भाजपला जेरीस आणता आले असते, अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.