काँग्रेस उतरणार स्वबळावर मैदानात
By Admin | Published: January 31, 2017 12:18 AM2017-01-31T00:18:38+5:302017-01-31T00:20:56+5:30
अंबाजोगाई : विरोधकांना रोखण्यासाठी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली.
अंबाजोगाई : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना रोखण्यासाठी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली.
जिल्हा परिषदेच्या ६० पैकी १० व पंचायत समितीच्या १२० पैकी १६ जागांवर तडजोड करून आघाडीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिला. परंतु या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आघाडी करायचीच नाही ? असा प्रश्न उपस्थित करीत मोदी यांनी स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी सांगितले.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, बर्दापूर अथवा पाटोदा, परळी तालुक्यातील नागापूर, धर्मापुरी या चार तसेच केज तालुक्यातील युसुफवडगाव, विडा, बीड तालुक्यातील एक, आष्टी तालुक्यातील एक, वडवणी तालुक्यातील एक अशा १० जि.प. गटांचा समावेश आहे. पंचायत समिती गणाच्या 16 जागांवर काँग्रेसने तडजोड करण्याचा प्रस्ताव देखील राष्ट्रवादीला दिला आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील ८ तर उर्वरीत ८ जागा जिल्हाभरातील आहेत.
प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली. मात्र, अद्यापही राष्ट्रवादीकडून आघाडीच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळत नाही. तसेच राष्ट्रवादीची आघाडी करण्याची तयारी दिसत नसल्यामुळे काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मोदी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)