काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी
By Admin | Published: May 13, 2016 12:01 AM2016-05-13T00:01:54+5:302016-05-13T00:10:53+5:30
औरंगाबाद : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यासंदर्भात गुरुवारी आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ झाली.
औरंगाबाद : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यासंदर्भात गुरुवारी आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ झाली. यामुळे पक्षाचे कार्यालय असलेल्या शहागंजमधील गांधी भवनात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, अशी हाणामारी झाल्याचा शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी इन्कार केला आहे.
नवनियुक्त शहराध्यक्ष पवार यांच्या कथित वादग्रस्त विधानावरून युवक काँग्रेसचे लियाकत खान पठाण आणि सोशल मीडिया विभागाचे राज्य कार्यकारिणी सदस्य जमील अहमद खान यांच्यात हा वाद झाला. यावेळी या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. विखे पाटील हे १५ मे रोजी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार तसेच राज्याचे पदाधिकारी असलेले अरुण मुगदिया, अशोक सायन्ना यादव तसेच युवक काँग्रेससह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हे पदाधिकारी बैठकीनंतर आतील रुममध्ये गेले असता बाहेर हा प्रकार घडला.
काय म्हणाले पवार?
सर्व विभागाच्या जुन्या कार्यकारिणी बरखास्त झाल्या आहेत, अशा प्रकारचे विधान आपण कोणत्याही माध्यमांशी बोलताना केले नाही, असा दावा नामदेव पवार यांनी केला आहे. ‘लोकमत’शी बोलताना पवार म्हणाले की, काही वादविवाद असतात. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा कोणताही प्रकार झाला नाही.
विखेंचा दौरा
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यात वैजापूर येथून पाहणी सुरू करणार आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा अहवाल ते प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविणार आहेत. दुुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचीही ते भेट घेणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार आणि इतर पदाधिकारी राहणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासंबंधी गुरुवारी गांधी भवनात बैठक झाली.
हाणामारीचे कारण
नवनियुक्त शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी शहरातील पक्षाचे सर्व सेल (विभाग) बरखास्त केल्याचे विधान माध्यमांशी बोलताना केले.
वर्तमानपत्रातील यासंबंधीच्या बातमीची पोस्ट जमील खान यांनी सोशल मीडिया विभागाचे सदस्य या नात्याने फेसबुकवर टाकली.
ही पोस्ट फेसबुकवर का टाकली, अशी विचारणा करून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते लियाकत पठाण यांनी खान यांना थप्पड लगावली. त्यानंतर इतर कार्यकर्तेही धावले.
दोन्ही बाजूंनी काही वेळ धक्काबुक्की आणि वादविवाद झाला. काही जणांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडविले.