वैजापूरची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीची ?
By Admin | Published: August 11, 2014 12:28 AM2014-08-11T00:28:27+5:302014-08-11T00:32:39+5:30
औरंगाबाद : वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
औरंगाबाद : वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील घडामोडी पाहता ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता जास्त आहे. तसे झाल्यास वैजापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हेच प्रबळ दावेदार ठरू शकतात. वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसलाच सुटत आला आहे; परंतु गेल्या दोन पंचवार्षिकचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर काँग्रेसचे भाऊसाहेब ठोंबरे व डॉ. दिनेश परदेशी हे तिसऱ्या क्रमांकावर होते.
जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ज्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकार राहिले, त्यांना यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पाठबळ देऊन उमेदवारी देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या बदल्यात काँग्रेसच्या वाट्याला अन्य मतदारसंघ जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे निश्चित आहे. तसे पाहिल्यास वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकला असता; परंतु चिकटगावकर बंधूंच्या वादामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे द्यावा लागला. दोघांमधील भांडणामुळे दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येतो. मागील निवडणुकीत चिकटगावकर बंधू अपक्ष उमेदवार म्हणून आमनेसामने होते. परंतु आता चिकटगावकर बंधूंमध्ये दिलजमाई झाल्याने वादाला पूर्णविराम मिळाला आहे. मागील निवडणुकीत कैलास पाटील चिकटगावकर यांना १४ हजार, तर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना ५० हजार मते मिळाली होती. त्यांचा निसटता पराभव झाला होता. सेनेचे आ. आर.एम. वाणी यांचा केवळ १२०० मतांनी विजय झाला होता. डॉ. दिनेश परदेशी यांना ४० हजार मते मिळाली होती. याशिवाय अपक्ष म्हणून रामहरी जाधव नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत.