ओबीसींना आपसात लढवण्याचा काँग्रेसचा डाव: नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:29 PM2024-11-15T12:29:31+5:302024-11-15T12:30:40+5:30
शरद पवार यांना वगळून काँग्रेसवर टीकेची झोड
छत्रपती संभाजीनगर : ओबीसींच्या जाती-जातींमध्ये भांडणे लावून काँग्रेसला सत्तेचा मलिदा खायचा आहे. ओबीसींचे आरक्षणही संपवायचे आहे, असा घणाघात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरच्या जाहीर सभेत घातला. काँग्रेसचा हा डाव उधळून लावण्याचे आवाहन त्यांनी केले. एक ओबीसी पंतप्रधान काँग्रेसच्या डोळ्यात खुपतोय, अशी जळजळीत प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी नोंदवली. महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय भाजपचे नेते राहत नाहीत. परंतु मोदी यांनी आजच्या भाषणात कुठेही शरद पवार यांच्यावर थेट वा अप्रत्यक्ष टीका केली नाही. काँग्रेसवर मात्र टीकेची झोड उठवली व शहजादे असा उल्लेख करीत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची ग्रॅहमहर्थ मैदानावर सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेते रावसाहेब दानवे, खा. डाॅ. भागवत कराड यांच्यासह मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर, संतोष दानवे, संजना जाधव, अनुराधा चव्हाण, प्रशांत बंब आदी महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.
२६ मिनिटांचे भाषण......
सुमारे २६ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मराठवाड्यातील इन्फ्रास्ट्रक्चर, सिंचन, सोयाबीन कापसाचा भाव, छत्रपती संभाजीनगर नामकरण आणि शहराचा पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र शासनाने केलेली मदत हे मुद्दे होते.
भाषणाची सुरुवात मराठीतून.....
भाषणाची सुरुवातही मराठीतूनच केली. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. गोरक्षणाथांचा प्रकट दिन आहे. लहुजी साळवे वस्तादांची जयंती आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली. नाना पेशवा यांचेही त्यांनी नामस्मरण केले.
७० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक
समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा मुंबईला जोडला गेला, मराठवाड्यात महामार्गांची कामे वेगाने सुरू आहेत, रेल्वे सेवेचा अत्याधुनिक विकास व विस्तार केला जात आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीतील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. ७० हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले आहेत, ४५ हजार कोटींचे उद्योग आले आहेत, भविष्यात अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार असून त्यासाठी राज्यात सर्वात मोठे इंडस्ट्रियल पार्क उभे राहणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढतील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
भविष्यात महाराष्ट्राला भारताचे नेतृत्व करायचे आहे !
भविष्यात महाराष्ट्राला विकसित भारताचे नेतृत्व करायचे आहे, त्यासाठी राज्यात विकासाचे अनेक प्रकल्प वेगाने सुरू आहेत. नवे उद्योग येत आहेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना आखल्या जात आहेत, पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. महाविकास आघाडीने सत्तेवर असताना प्रगतीची गती रोखून धरली. विकासाच्या विरोधात असलेली काँग्रेस आणि त्यांचे साथीदार महाराष्ट्राचे कधीच हित करणार नाहीत, म्हणून या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा आणि महायुतीला विजयी करा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.