स्ट्रेचर अभावी बाळाच्या मृत्यू प्रकरणात सहसंचालक तात्याराव लहाने यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:19 PM2019-02-01T12:19:00+5:302019-02-01T12:19:32+5:30
या संपूर्ण घटनेला जबाबदार धरून कर्तव्यावर हजर कर्मचार्याबरोबर रुग्णालय आणि प्रशासनातील दोषींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या झालेल्या मृत्यूची राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयने ( डीएमईआर) गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, आज त्यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. यासाठी सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने हे घाटीत दाखल झाले असून त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, त्यांनी घाटी रुग्णालयातील विविध विभागांना भेट दिली. तसेच स्ट्रेचर अभावी नवजात बाळाच्या झालेल्या मृत्यू झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसूतिशास्त्र विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे डॉ.अरविंद गायकवाड, डॉ. राजन बिंदू , डॉ. मोहन डोईबळे, डॉ. श्रीनिवास गडाप्पा , डॉ. सोनाली देशपांडे , डॉ .मीनाक्षी भट्टाचार्य यांच्यासह अधिकारी हजर होते.
प्राथमिक चौकशीत घटनेच्या दिवशी कर्तव्यावर हजर असलेल्या डॉक्टरांपासून तर चतुर्थश्रेणी अशा दहा जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या. यानंतर या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली. आता ‘डीएमईआर’कडूनही घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेला जबाबदार धरून कर्तव्यावर हजर कर्मचार्याबरोबर रुग्णालय आणि प्रशासनातील दोषींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
पहा व्हिडीओ :