डीएमआयसीसोबत समृद्धी महामार्गाच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा गुंता सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 07:32 PM2020-10-17T19:32:36+5:302020-10-17T19:35:05+5:30
Samruddhi Mahamarga ‘एमआयडीसी’चे संचालक मंडळ पेचात
औरंगाबाद : दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याही फुकट, अशा मानसिकतेतून समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा गुंता वाढत चालला आहे. ‘नागपूर-मुंबई’ व्हाया औरंगाबाद या सुपर एक्स्प्रेसवे अर्थात समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयारी दर्शविली खरी. मात्र, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम आणि इंटरचेंजच्या कामाचे पैसे देण्याच्या अटीवरून ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे.
झाले असे की, ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ने समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीबाबत चार महिन्यांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळासमोर प्रस्ताव मांडला होता. तोपर्यंत या महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले होते. तरीही उद्योगमंत्री सुभाष देसाई व आदित्य ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने सशर्त तयारी दर्शविली. या ‘सुपर एक्स्प्रेस वे’च्या निकषानुसार जोडणाऱ्या रस्त्याचे डिझाईन ‘एमआयडीसी’ला दिले. दिलेल्या डिझाईननुसार रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ने करावे. कनेक्टिव्हिटीच्या ठिकाणी इंटरचेंजचे काम ‘मेगा इंजिनिअरिंग ही’ समृद्धी महामार्गाची कंत्राटदार संस्था करेल. या कामासाठी लागणारा अंदाजित २० ते २५ कोटी रुपयांची रक्कम ‘एमआयडीसी’ने द्यावी, या अटी ‘एमएसआरडीसी’ने घातल्या आहेत. नेमक्या या अटी एमआयडीसीला रुचलेल्या दिसत नाहीत.
‘एमआयडीसी’च्या कार्यालयीन सूत्रांनी सांगितले की, ‘एमएसआरडीसी’ने कनेक्टिव्हिटी देण्यासाठी मान्यता दिली असली, तरी त्यांचा हा खर्चिक प्रस्ताव एमआयडीच्या संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. संचालक मंडळ काय निर्णय घेते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास तरी भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नाही. ही कनेक्टिव्हिटी शेंद्रा व जयपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आहे.
पावसामुळे रखडले बोगद्याचे काम
‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले की, पावसामुळे समृद्धी महामार्ग व बोगद्याच्या कामात थोडा व्यत्यय आला होता. आता पाऊस थांबलाय. आता गतीने काम सुरू होईल. सावंगीजवळ बोगदा तयार केला जात आहे. बोगद्याच्या कामासाठी डोंगर कोरणारी मशीन हैदराबाद येथून मागविण्यात आली आहे. पावसामुळे ती इथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. दोन मशीनच्या माध्यमातून एकाच वेळी दोन्ही बाजूने बोगद्याचे काम आठवडाभरात सुरू होईल. डिसेंबरअखेरपर्यंत बोगदा तयार होईल.