समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 09:33 AM2022-01-07T09:33:40+5:302022-01-07T09:33:51+5:30
समृद्धी महामार्गाने दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे.
- विजय सरवदे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समृद्धी महामार्गाने दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे. तर, जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी एमआयडीसीला एकूण ८ एकर भूसंंपादन करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमआयडीसीकडून ४१.१४ कोटींची आगाऊ रक्कम प्राप्त झाली आहे.
प्राप्त रकमेतून ‘एमएसआरडीसी’कडून समृद्धी महामार्गावर केवळ इंटरचेंज उभारले जाणार आहे. इंटरचेंजपासून शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत जवळपास ९०० मीटर लांबीचा रस्ता एमआयडीसीला करावा लागणार आहे. इंटरचेंजसाठी ४ एकर आणि रस्त्यासाठी ४ एकर असे एकूण ८ एकर भूसंपादन एमआयडीसीला करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना एमएसआरडीसीने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा पाचपट मावेजा दिला होता. तेवढाच मावेजा एमआयडीसीने द्यावा, या मुद्द्यावर शेतकरी अडले आहेत. तथापि, एमआयडीसीने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या असून त्यावर हरकती, मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
कनेक्टिव्हिटी गरजेची
‘डीएमआयसी’ या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करायचे असेल, तर दळणवळणाची सुविधा उत्तम हवी. यासाठी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली पाहिजे. समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी असावी, अशी उद्योग संघटनांची अपेक्षा आहे.
वाहतुकीला व्यत्यय नाही
‘एमआयडीसी’कडून इंटरचेंज उभारणीचे काम पूर्ण होईल. तत्पूर्वी, जर या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली, तरीही कनेक्टिव्हिटीच्या कामाचा अडथळा येणार नाही. मात्र, इंटरचेंज व एमआयडीसीच्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच समृद्धी महामार्गावरून ‘डीएमआयसी’ची वाहतूक सुरू होईल.