सलग सुट्यांनी पर्यटननगरी गजबजली; पर्यटकांची तोबा गर्दी
By संतोष हिरेमठ | Published: August 14, 2023 02:54 PM2023-08-14T14:54:29+5:302023-08-14T15:01:01+5:30
बीबी का मकबरा, देवगिरी किल्ल्यातील चांद मिनार उजळला तिरंगी विद्युत रोषणाईने
छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारची एक सुटी टाकून सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांकडून पर्यटनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पर्यटकांचा ओघ वाढत असून रविवारी ‘दख्खन का ताज’ म्हणजे बीबी का मकबरा नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेला. स्वातंत्र्य दिनानिमित्त बीबी का मकबरा, देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील चांद मिनार तिरंगी विद्युत रोषणाईने उजळला.
रविवारची सुटी म्हटली की, पर्यटन असे समीकरण पाहायला मिळते. अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग सुट्यांचा योग जुळवून ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येत आहेत. त्यामुळे देशभरातील पर्यटक पर्यटननगरीत दाखल होत आहेत. शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद लेणी येथे रविवारी पर्यटकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात ढगाच्या गर्दीने वातावरण आल्हाददायक बनले होते. अशा वातावरणात पर्यटनाचा आनंद नागरिकांनी घेतला.
नेहमीपेक्षा अधिक गर्दी
एरव्ही सुटीच्या दिवशी बीबी का मकबऱ्याला पर्यटकांची गर्दी असते; परंतु रविवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
देशप्रेमाचे वातावरण, सेल्फीवर भर
बीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ल्यातील चांद मिनारवर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली. तिरंगी विद्युत रोषणाईने उजळलेला मकबरा पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली. तिरंगी विद्युत रोषणाईतील मकबऱ्यासोबत पर्यटक सेल्फी घेत होते. तिरंगी विद्युत रोषणाईने मकबरा परिसरात पर्यटकांमध्ये देशप्रेमाचे वातावरण दिसले.