सर्व्हायकल कॅन्सरचा धोका वेळीच लक्षात घ्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:02 AM2021-03-08T04:02:27+5:302021-03-08T04:02:27+5:30
याविषयी सांगताना डॉ. मनीषा म्हणाल्या की, सध्या सर्व्हायकल कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. महिलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण या ...
याविषयी सांगताना डॉ. मनीषा म्हणाल्या की, सध्या सर्व्हायकल कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. महिलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण या प्रकारच्या कर्करोगाचे आहे. त्यामुळेच महिलांना या आजाराविषयी जागरूक करणे आज काळाची गरज झाली आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. या व्हायरसचे १०० स्ट्रेन दिसून येतात. मात्र, यापैकी एचपीव्ही १६ आणि एचपीव्ही १८ हे दोन स्ट्रेनच कर्करोगाला आमंत्रण देतात. या प्रकारच्या कर्करोगात एक विचित्र प्रकारची गुंतागुंत आहे. ती म्हणजे ८० ते ९० टक्के स्त्रियांमध्ये हा व्हायरस येतो आणि अनेकींच्या शरीरातून आपोआप निघूनही जातो. मात्र, ज्या स्त्रिया शारीरिकदृष्टया दुर्बल आहेत, ज्यांना विविध आजार आहेत किंवा ज्या महिलांच्या आई, मावशी, बहीण, आजी यांना हा कर्करोग झाला आहे, त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येकीनेच या आजाराबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.
चौकट :
धोकादायक आकडेवारी
- जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, २०२० ला सहा लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला आहे.
- या सहा लाख महिलांपैकी तीन लाख ४० हजार महिलांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
- सहा लाख महिलांपैकी दर चौथी महिला ही भारतीय आहे. यावरूनच भारतीय महिलांना या कर्करोगाचा किती धोका आहे, हे लक्षात येते.
- या आजारामुळे दर सात मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होत आहे.
- नियमित तपासणी, योग्य उपचार आणि लसीकरण यांच्या मदतीने हा आजार होण्यापासून रोखता येतेे.
चौकट :
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा यांना आहे धोका -
- लैंगिक संबंधातूनही एचपीव्ही १६ आणि एचपीव्ही १८ चा प्रसार होत असल्याने सेक्शुअली ॲक्टिव्ह असणाऱ्या प्रत्येक महिलेला या आजाराचा धोका आहे.
- पुरुषांमध्येही हा व्हायरस असतो; परंतु त्यांना या व्हायरसपासून कोणताही धोका नसतो.
- एकपेक्षा अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध असणे.
- ज्या महिलांच्या पतीचे एकापेक्षा जास्त महिलांसोबत संबंध असतात, त्या महिलेलाही हा आजार होण्याची शक्यता वाढलेली असते.
- ड्रग्स सेवन, धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूचे व्यसन करणाऱ्या महिला.
- ज्यांनी इतर कोणत्या आजारासाठी केमोथेरपी घेतली आहे, अशा महिला.
- १८ वर्षांच्या आतच विवाह झालेल्या महिला.
- वर्षानुवर्षे गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिला.
- अस्वच्छता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे.
- ज्यांना वारंवार व्हजायनल इन्फेक्शन होते, अशा महिला.
- ज्या महिलांना वारंवार गर्भपात आणि बाळंतपणाला सामोरे जावे लागते.
चौकट :
लक्षणे कशी ओळखायची -
- गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत सर्वांत धोकादायक गोष्ट म्हणजे या आजाराची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. जेव्हा हा कर्करोग तिसऱ्या, चौथ्या स्टेजला जातो, तेव्हाच त्याची काही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे नियमित तपासणी करणे हा या आजारावरचा सर्वांत प्रभावी इलाज आहे.
- आजार खूप जास्त बळावल्यानंतर योनी मार्गातून अत्यंत दुर्गंधी असणारे पांढरे पाणी जाणे, रक्तस्राव होणे, शारीरिक संबंधानंतर ओटीपोटात दुखणे आणि रक्तस्राव होणे, लघवी आणि शौचाद्वारे रक्त पडणे, अशी लक्षणे दिसू लागतात.
चौकट :
आजाराची तपासणी कशी करायची -
- पॅपस्मियर, एलबीसी म्हणजेच लिक्वीड बेस सायटोलॉजी या दोन तपासण्यांच्या माध्यमातून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे की नाही हे तपासता येते.
- यापैकी एलबीसी ही सद्य:स्थितीला सर्वांत उत्कृष्ट तपासणी पद्धती मानली जाते.
- या आजाराची प्री कॅन्सर कंडिशन अवस्था ही तब्बल १० ते १५ वर्षे असून, ती इतर कोणत्याही कर्करोगापेक्षा खूप मोठी असते. त्यामुळेच या काळात जर आजार लक्षात आला, तर त्याचे तत्काळ उपचार करता येतात आणि १०० टक्के या कर्करोगापासून रुग्णाला वाचविता येते.
- म्हणूनच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी २१ ते ६० वर्षे या वयोगटातील महिलांनी दर तीन वर्षांतून एकदा या तपासण्या करणे गरजेचे आहे.
- कॅलपोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीच्या माध्यमातून गर्भाशयाच्या मुखाची तपासणी करणे, कॅलपोस्कोपी आणि बायोप्सी या तपासण्याही या आजारात केल्या जातात.
- एचपीव्ही डीएनए टेस्ट ही या आजारासाठीची अत्यंत उत्तम चाचणी असून, तिचा निकाल ९९.९९ टक्के अचूक असतो. त्यामुळे दर पाच वर्षांतून एकदा महिलांनी ही तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
- क्रायोथेरपी आणि लीप म्हणजेच लूप इलेक्ट्रो एक्झीशन प्रोसिजर या माध्यमातून गर्भाशयात कर्करोगाचा किंवा इतर कोणता संसर्ग आहे का हे जाणून घेता येते.
चौकट :
गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
- १८ वर्षांनंतरच मुलीचा विवाह.
- विवाहबाह्य संबंध टाळणे.
- आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी सांभाळणे.
- व्यसनांपासून दूर राहणे.
- मेनोपॉजनंतर विशेष काळजी घ्यावी.
- २१ ते ६० वर्षे या वयोगटातील महिलांनी नियमित तपासणी करावी.
चौकट :
वेळीच लसीकरण घ्या, आजारापासून स्वत:ला वाचवा
- सर्व्हायकल कॅन्सर टाळण्यासाठी लसीकरण हा अत्यंत प्रभावी इलाज आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबात हा कॅन्सर कुणा नातलगांना झाला आहे, त्यांनी वेळीच लसीकरण करून घ्यावे.
- ९ ते २१ वर्षे या वयोगटातील मुलींना हा आजार होऊ नये म्हणून दोन टप्प्यांत लसीकरण करता येते. तसेच या वयोगटात केलेले लसीकरण सर्वांत प्रभावी ठरते.
- २१ ते ४५ वर्षे या वयोगटातही लस देता येते.
- लसीकरण पद्धती अत्यंत सोपी असून, लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नाही.
- लस घेण्याआधी दोन दिवस शारीरिक संबंध टाळावेत.
- पाळी येऊन दहा दिवस झाल्यानंतरचा काळ लसीकरणासाठी योग्य मानला जातो.
चौकट :
लसीकरण आणि तपासणीसाठी विशेष सवलत
अनंतश्री फर्टिलिटी ॲण्ड आयव्हीएफ सेंटरतर्फे लसीकरण आणि सर्व्हायकल कर्करोगाची तपासणी करून घेण्यासाठी महिलांना विशेष सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन अनंतश्री फर्टिलिटी ॲण्ड आयव्हीएफ सेंटरतर्फे करण्यात येत आहे.