बाबासाहेबांना बाप मानलं, भय्यासाहेबांना भाऊ मानलं, आम्हाला मुलं मानून साथ द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:54 PM2022-12-13T15:54:16+5:302022-12-13T15:54:16+5:30
रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी घातली भावनिक साद
औरंगाबाद : ‘डॉ. बाबासाहेबांना बाप मानता, भय्यासाहेबांना भाऊ मानता, आम्हाला मुले माना,’ अशी भावनिक साद सोमवारी येथे रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला घातली. ते म्हणाले, ‘भय्यासाहेब बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी राबराब राबले, हे कुणालाही विसरता येणार नाही.’
ते मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद हिरोडे हे होते. बाबासाहेबांचा खरा सन्मान भय्यासाहेबांनी केला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळवून चैत्यभूमी उभी केली, याचा इतिहास आनंदराज यांनी उलगडून सांगितला.
भीम शाहीर मेघानंद जाधव यांनी भीमगीते गायिली. प्रा. महादेव उबाळे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. प्रमोद हिरोडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप वाकडे यांनी केले. प्रा. संजीव बोधनकर, किशोर जोहरे, मिलिंद बनसोडे, मधुरा गोरे, डॉ. भास्कर साळवी, ज्योती हिवाळे, डॉ. पूर्वा कार्तिक आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पीईएसचे उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणीप्रश्नावर केलेल्या कार्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. नजीकच्या काळात संपूर्ण पीईएस आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालेल, असे संकेतही देशकर यांनी दिले. विजय वाकोडे यांनी नाव न घेता रामदास आठवले यांच्यावर टीका केली. भय्यासाहेबांकडे आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व जाऊ नये याचे प्रयत्न केले गेले, असा आरोप प्रा. हृषीकेश कांबळे यांनी केला. सा. बां. खात्याचे औरंगाबादचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांचेही भाषण झाले.