जालन्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:06+5:302021-03-04T04:06:06+5:30
बदलीसंदर्भात जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याच्या नाराजीने सवडे यांनी औरंगाबाद ...
बदलीसंदर्भात जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याच्या नाराजीने सवडे यांनी औरंगाबाद प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला. याचिकेवर १५ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे .
प्रतापराव सवडे यांची १५ सप्टेंबर २०१९ रोजी जालना जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आणि कल्पना क्षीरसागर यांची जालना जिल्हा परिषदेअंतर्गत प्रकल्प संचालक (प्रोजेक्ट डायरेक्टर) या पदावर बदली करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याच्या नाराजीने क्षीरसागर यांनी या आदेशाविरुद्ध मॅटमध्ये धाव घेतली असता मॅटने क्षीरसागर यांच्या बदलीचा आदेश रद्द केला. त्यांना पुन्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर ठेवण्याचा आदेश दिला. त्या नाराजीने सवडे यांनी अॅड. संभाजी टोपे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. मागील सहा महिन्यांपासून दोन्ही अधिकारी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी कार्यरत असून, सवडे यांना तत्काळ त्यांच्या पदावरून हलविणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद अॅड. टोपे यांनी केला. क्षीरसागर यांच्यावतीने अॅड. आनंद देवकते यांनी काम पाहिले.