औरंगाबादकरांना दिलासा...कोरोनाचा जोर ओसरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:41 AM2020-10-11T11:41:25+5:302020-10-11T11:42:41+5:30
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे. परिणामी, रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे.
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे. परिणामी, रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. या सगळ्यात दररोज मृत्यू सुरुच आहे. परंतु ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लवकरच मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.
औरंगाबादेत १५ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. तेव्हापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्येचा आलेख वाढताच होता. दरदिवशी २०० ते ४०० च्या घरात रुग्णांचे निदान होत गेले. त्यातही औरंगाबादेत जून महिना उजडताच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढीचा वेग वाढला हाेता. मार्च ते मे अशा ३ महिन्यांत आढळलेली रुग्णसंख्या जूनच्या २२ दिवसांतच दुप्पट झाली. गेल्या ७ महिन्यांत रुग्णसंख्येने ३५ हजारांपर्यंतची मजल मारली आहे.
मात्र आता सप्टेंबरअखेरीस रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्षात चाचण्या कमी होत आहेत की रुग्णसंख्या कमी होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. परंतु चाचण्यात घट करण्यात आलेली नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. रुग्णसंख्या घटल्याने आयसीयू बेड, ऑक्सिजन बेडसह शेकडो जनरल बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी ६ हजार रुग्णांवर उपचार सुरु होते. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या शुक्रवारी सोडतीन हजार होती. यावरूनच कोरोनाचा जोर ओसरताना दिसत आहे.