रेल्वे प्रवाशांना दिलासा, सोमवारपासून काचीगुडा - रोटेगाव डेमू अनारक्षित एक्स्प्रेस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 01:04 PM2021-11-10T13:04:58+5:302021-11-10T13:06:36+5:30
ही रेल्वे पूर्वी काचीगुडा - रोटेगाव - काचीगुडा पॅसेंजर म्हणून धावत होती. आता ही रेल्वे डेमू अनारक्षित एक्स्प्रेस बनून धावणार आहे.
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेकडून १५ नोव्हेंबरपासून काचीगुडा - रोटेगाव - काचीगुडा डेमू एक्स्प्रेस सुरू करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ स्पेशल रेल्वे धावत असल्याने अनारक्षित प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. काचीगुडा - रोटेगाव डेमू अनारक्षित एक्स्प्रेस सोमवारपासून सुरु झाल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
ही रेल्वे पूर्वी काचीगुडा - रोटेगाव - काचीगुडा पॅसेंजर म्हणून धावत होती. आता ही रेल्वे डेमू अनारक्षित एक्स्प्रेस बनून धावणार आहे. काचीगुडा ते रोटेगाव डेमू एक्स्प्रेस १५ नोव्हेंबरपासून काचीगुडा रेल्वे स्टेशनवरून पहाटे ४.५० वाजता सुटेल. मेदचल, निझामाबाद, नांदेड, परभणी, जालनामागे ही रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सायंकाळी ६.१५ वाजता येईल आणि ६.२० वाजता रवाना होईल. रोटेगाव येथे रात्री ८.३० वाजता ही रेल्वे पोहोचेल.
रोटेगाव ते काचीगुडा डेमू एक्स्प्रेस १५ नोव्हेंबरपासून रोटेगाव रेल्वे स्टेशनवरून रोज सकाळी ५.४० वाजता सुटेल आणि औरंगाबादला सकाळी ६.५५ वाजता दाखल होईल. त्यानंतर ७ वाजता ही रेल्वे पुढे रवाना होईल. जालना, परभणी, नांदेड, निझामाबादमार्गे काचीगुडा येथे ही रेल्वे रात्री १०.४५ वाजता पोहोचेल.