माझ्याविरोधात पक्षातील नेत्याचाच कट; सत्तारांच्या आरोपाने शिंदे गटातील कुरघोडी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 02:25 PM2022-12-31T14:25:15+5:302022-12-31T14:27:13+5:30
टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घेरले होते.
औरंगाबाद: संपूर्ण हिवाळी अधिवेशन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील विविध आरोपांनी गाजले. आता यावर मंत्री सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली असून माझ्याविरोधात पक्षातील मंत्रिपद न मिळालेला नेता कट करत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही सत्तार यांनी जाहीर केले. यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये अंतर्गत कुरघोडीचा प्रकार समोर आला आहे.
टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घेरले होते. याबाबत अधिवेशनात कृषिमंत्री सत्तार यांनी भावूक होत बाजू मांडली. दरम्यान, सिल्लोड महोत्सव उद्यापासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात मंत्रीपद मिळत असताना आणि मंत्री झाल्यानंतर वरचेवर होणाऱ्या आरोपांवर सत्तार यांनी खळबळजनक दावा केला आहे. मी मंत्री नसतानाही माझ्यावर आरोप होतात. दरम्यान, आता ज्याला मंत्रिपद मिळाले नाही असा पक्षातील नेता माझ्याविरोधात कट करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कॅबीनमधील चर्चा बाहेर येते. यावरून मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे, असेही सत्तार यांनी म्हटले. दरम्यान, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सत्तार म्हणतात यात काही तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे.
१ लाख लीडने निवडून येईल
मी लोकांसाठी काम करतो, छोटा कार्यकर्ता आहे. अल्पसंख्याक समाजातील असून कॅबिनेट मंत्री म्हणून चांगले काम करत आहे. मागील वेळी २५ हजार मतांनी निवडून आलो होतो. यावेळी १ लाखांचा मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.