काहीही करून आरक्षण संपवायचा कट, वंचितांनी एकत्र येण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 07:07 PM2024-09-13T19:07:19+5:302024-09-13T19:07:42+5:30
आरएसएसवाले हिंदुत्व धोक्यात आल्याचे सांगत आहेत. हा फसवा प्रचार आहे: प्रकाश आंबेडकर
वैजापूर : सध्या सर्वच आरक्षण हे धोक्यात आले आहे. काहीही करून आरक्षण संपवायचा कट आखण्यात आला आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी यांनी एकत्र यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
अहिल्या संदेश यात्रेचा समारोप बुधवारी वैजापूर येथे झाला. यावेळी ते बोलत होते. वैजापूर तालुक्यात दहा दिवसांपासून अहिल्या संदेश यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेच्या समारोपप्रसंगी ॲड. प्रकाश आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींनी जागरूक होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आरएसएसवाले हिंदुत्व धोक्यात आल्याचे सांगत आहेत. हा फसवा प्रचार आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब जानराव यांनी केले. यावेळी रंगनाथ जाधव, मुकुंदराजे होळकर, बापूसाहेब शिंदे, अंजनीताई आंबेडकर, प्रभाकर बडले, गोविंद दळवी, योगेश भड, विपीन साळवे आदींची उपस्थिती होती.