मला जेलमध्ये डांबण्यासाठी षडयंत्र; मी तेथेही उपोषण करीन, पण मागे हटणार नाही: मनोज जरांगे
By बापू सोळुंके | Published: March 19, 2024 11:37 AM2024-03-19T11:37:45+5:302024-03-19T11:38:40+5:30
मराठा समाजाला सगेसोयऱ्याचे आरक्षण मिळवून देणार: मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सगेसोयऱ्याचे आरक्षण देण्याच्या आश्वासनाची सरकार जोपर्यंत पूर्तता करीत नाही, ताेपर्यंत मी गप्प बसणार नाही. माझ्याविरोधात दररोज गुन्हे नोंदविले जात आहेत. एवढेच नव्हे, तर मला जेलमध्ये डांबण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. मी जेलमध्ये गेलो, तरी तेथेही उपोषण करीन. पण, मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी रात्री मुकुंदवाडी येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केली.
मुकुंदवाडी येथील कै. पहिलवान लक्ष्मण डांगे रुग्णवाहिका आणि गावातील प्रवेशद्वार नूतनीकरणानंतर सोमवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब डांगे, मोतीलाल जगताप, भाऊसाहेब जगताप, मनोज बोरा, ज्ञानेश्वर डांगे, हनुमान शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जरांगे पाटील म्हणाले की, मी समाजाला माय-बाप मानले आहे. यामुळे काहीही झाले तरी समाजाविरोधात गद्दारी करणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपल्याविरोधात गुन्हे नोंदविले जात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार छगन भुजबळ हे मराठा समाजाविरोधात बोलत असतात. मराठा समाजाला न्याय दिला नाही, तर समाज त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
२४ रोजीच्या बैठकीला येण्याचे आवाहन
२४ मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आपण केले आहे. ही बैठक पुढील लढ्यासाठी निर्णायक असेल, असेही त्यांनी नमूद केले.