जालन्यातील खुल्या जागांवर संरक्षक भिंती बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:15 AM2018-02-17T00:15:52+5:302018-02-17T00:15:59+5:30
नागरी भागात स्थानिक रहिवाशांकरिता सार्वजनिक, तसेच दैनंदिन उपयोगाकरिता मोकळ्या जागा आहेत. या जागांवरील अतिक्रमण टाळण्यासाठी संरक्षक भिंती बांधण्याच्या विषयाला नगरपालिकेच्या नियोजन व विकास समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागरी भागात स्थानिक रहिवाशांकरिता सार्वजनिक, तसेच दैनंदिन उपयोगाकरिता मोकळ्या जागा आहेत. या जागांवरील अतिक्रमण टाळण्यासाठी संरक्षक भिंती बांधण्याच्या विषयाला नगरपालिकेच्या नियोजन व विकास समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
उपनगराध्यक्षा तथा नियोजन समितीचे पदसिद्ध सभापती राजेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केशव कानपुडे, समितीच्या सदस्य अजय भरतिया, आशा ठाकूर, विनोद रत्नपारखे, घनश्याम परदेशी, रेणुका निकम, सोनाली चौधरी, गणेश राऊत, रमेश गौरक्षक, नजीब लोहार यांची बैठकीस उपस्थिती होती.
सार्वजनिक वापराच्या मोकळ्या जागांवर स्थानिक नागरिक घरगुती कार्यक्रम, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात. मात्र, अशा ठिकाणी अतिक्रमण होण्याचे प्रकार वाढत आहेत.
हे टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून भिंती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे अवजड वाहने उभी करणाºयांवर पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडून कारवाई करणे, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रस्तावित आरक्षणे, खेळाची मैदाने, आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, उद्यान, वाचनालये आदींचा विकास करण्यासाठी निधी मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठविणे या विषयाला सभेत मंजुरी देण्यात आली. शहरातील खुल्या जागांवर शक्य तिथे नाना-नाणी पार्क विकसित करणे, लहान मुलांना सापांबाबत माहिती मिळावी, जनजागृती व्हावी, तसेच उद्यानात येणाºयांचे मनोरंजन या उद्देशाने छत्रपती संभाजीराजे उद्यानात सर्पोद्यान विकसित करणे आवश्यक वाटते का, याबाबत उद्यान विभागाने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांकडे पाठवणे या विषयांना नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
स्मशानभूमी न.प.च्या नावे करण्याला मंजुरी
शहरातील स्मशानभूमीच्या जागांची मालकी नगरपालिकेच्या नावावर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी विविध प्रकारची आवश्यक कामे करणे पालिकेला शक्य होत नाही. स्मशानभूमीच्या जागा नगरपालिकेच्या नावाने करून या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या निर्णयाला नियोजन समितीने मंजुरी दिली.
शहराच्या विकास आराखड्यात स्मशानभूमीकरिता आरक्षित जागेची मालकी शासकीय किंवा खाजगी नावे असल्याने या जागा संपादित करण्याकरिता जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्याच्या विषयालाही समितीने मंजुरी दिली.