वास्तवाचे दर्शन अभिनयातून घडवा
By Admin | Published: May 4, 2016 01:15 AM2016-05-04T01:15:28+5:302016-05-04T01:25:15+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील युवा कलावंतांमध्ये प्रचंड ऊर्जा व जबरदस्त इच्छाशक्ती आहे. तरीही न्यूनगंडामुळे ते मागे पडतात. पुणे- मुंबईसारख्या महानगरात जाऊन वास्तव जीवनाचे
औरंगाबाद : मराठवाड्यातील युवा कलावंतांमध्ये प्रचंड ऊर्जा व जबरदस्त इच्छाशक्ती आहे. तरीही न्यूनगंडामुळे ते मागे पडतात. पुणे- मुंबईसारख्या महानगरात जाऊन वास्तव जीवनाचे दर्शन अभिनयातून घडविणारे कलावंत यशस्वी ठरले आहेत, असे प्रतिपादन ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’फेम अभिनेता योगेश सिरसाठ यांनी रविवारी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या ४१ व्या नाट्य महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागातील डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. स्मिता साबळे यांची उपस्थिती होती. यावेळी नाट्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी योगेश सिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्या कारकीर्दीची जडणघडण याच विभागात झाली. मेहनत व जिद्दीच्या बळावर आपण मुंबईत जाऊन नाव कमवू शकतो. पुणे- मुंबई व आपल्या जीवनशैलीत खूप फरक आहे. त्यामुळे आपण आपली मूळ शैली जपून अभिनय केला पाहिजे. स्वत:मधील न्यूनगंड झटकून देऊन करिअर घडवा, असेही ते म्हणाले.
नाट्यशास्त्र विभागाची देदीप्यमान परंपरा मराठवाड्यासाठी भूषणावह असल्याचे मत बाबा भांड यांनी व्यक्त केले. मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे तशीच ती कलावंतांची भूमी असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे म्हणाले. डॉ. बऱ्हाणपूरकर यांनी प्रास्ताविकात विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुनील टाक याने संचालन केले. प्रा. गजानन दांडगे यांनी आभार मानले.