समृद्धी महामार्गावरील नांदेड - जालना पट्ट्याचे १४ हजार ५०० कोटींतून बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 07:44 PM2022-02-14T19:44:03+5:302022-02-14T19:44:10+5:30
७७ टक्के मोजणी पूर्ण : चार महिन्यात २२०० हेक्टर भूसंपादन करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट
औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचा विस्तारित भाग असलेल्या प्रस्तावित जालना - नांदेड द्रुतगती मार्गासाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या एकूण जमिनीपैकी ७७ टक्के जमिनीची संयुक्त मोजणी (जेएमएस) पूर्ण झाली असून, १४ हजार ५०० कोटींतून हे बांधकाम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (एमएसआरडीसी) हा प्रकल्प राबविला जात असून, या मार्गासाठी लागणाऱ्या २,२०० हेक्टर जमिनीचे संपादन चार महिन्यांत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे.
समृद्धी महामार्गाचा विस्तारित भाग असलेल्या जालना - नांदेड द्रुतगती मार्गाची लांबी १७९ किलोमीटर असून, ८७ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या ८७ गावांपैकी ६७ गावांमधील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
असे कमी होईल अंतर----
जालना - नांदेड द्रुतगती मार्गामुळे या दोन्ही शहरांमधील २२६ किलोमीटरचे अंतर १७९.८ किलोमीटर एवढे होणार आहे. तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा १२ तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे. परभणी (९३ किलोमीटरचा पट्टा), जालना (६६.४६ किलोमीटर) आणि नांदेड (१९.८२ किलोमीटर) या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे. प्रस्तावित जालना - नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडला जाणे अपेक्षित आहे.
२२०० हेक्टर जमीन घेणार ताब्यात
संपूर्ण ग्रीनफिल्ड प्रकल्प असलेल्या या द्रुतगती मार्गासाठी २,२०० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून, बांधकामासाठी १४ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. ऑक्टोबर, २०२४पर्यंत हा द्रुतगती मार्ग बांधण्याचा एमएसआरडीसीचा संकल्प आहे. जालना - नांदेड द्रुतगती मार्गामुळे जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे उर्वरित महाराष्ट्राशी जोडले जातील.
चार महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया... या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन चार महिन्यांत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट असून, पुढील महिन्यात मार्गाच्या बांधकामासंदर्भातील निविदा जारी केल्या जातील, असा महामंडळाला विश्वास आहे. २०२४च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मार्गाची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.
- राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,एमएसआरडीसी