महिला रुग्णालयाच्या उभारणीला सुरुवात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:04 AM2021-06-22T04:04:02+5:302021-06-22T04:04:02+5:30
सपाटीकरणात गेला महिना : भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून तारखेची प्रतीक्षा संतोष हिरेमठ औरंगाबाद : शहरात तब्बल ७ वर्षांपासून प्रतीक्षेत ...
सपाटीकरणात गेला महिना : भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून तारखेची प्रतीक्षा
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात तब्बल ७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीला अखेर सुरुवात झाली. दूध डेअरी येथील जागेतील जुने बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु भूमिपूजनाअभावी काम संथगतीने सुरू आहे. सपाटीकरणातच एक महिना गेला आहे. भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून तारीख मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
महिला व नवजात शिशू रुग्णालयासाठी अनेक वर्षे जागेची शोधाशोध करण्यात आली. अखेर २०१८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दूध डेअरीची जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून २०१९ मध्ये रुग्णालयाच्या उभारणीसाठी १३९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. यात १११ कोटी ८९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. त्यानंतर दूध डेअरी येथील जागेत प्रत्यक्ष कामाला मुहूर्त मिळाला आहे. येथील जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. परंतु, भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत काम कासवगतीने सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी त्यांची तारीख मिळण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. सध्या जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
१५ दिवसांत सपाटीकरण पूर्ण
आगामी १५ दिवसांत सपाटीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.
-------
अशी आहे महिला रुग्णालयाची इमारत
-४ मजली इमारत
-८४ निवासस्थाने
-एक धर्मशाळा
------
फोटो ओळ
१) दूध डेअरी येथील महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या जागेतील जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे.
२) महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे संकल्प चित्र.