ग्राहक समाधान सर्वेक्षणात औरंगाबाद विमानतळ दहाव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 01:23 PM2019-04-03T13:23:18+5:302019-04-03T13:25:54+5:30
नॉन मेट्रो श्रेणीतील सर्वेक्षणात अनेक मापदंडांची पडताळणी
औरंगाबाद : ग्राहक (प्रवासी) समाधान सर्वेक्षणात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नॉन मेट्रो विमानतळाच्या श्रेणीत देशभरात दहावे स्थान मिळविले आहे.
एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाने देशातील ५२ विमानतळांवर जानेवारी ते जून २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात ग्राहक समाधान सर्वेक्षण (कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे) केले. त्यानंतर जुलै ते डिसेंबर २०१८ मध्ये दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या गाईडलाईननुसार ३३ मापदंड होते. यात स्वच्छता, पार्किंग, बॅग्ज डिलिव्हरी स्पीड, वॉशरूम सुविधा, ट्रॉली सुविधा, चेक इन लाईन, सुरक्षा, विमानतळावरील कर्मचाऱ्यांची वागणूक, फ्लाईट इन्फॉर्मेशन स्क्रीन, सुरक्षा तपासणीत लागणारा वेळ, शिष्टाचार आणि निरीक्षणात सुरक्षा कर्मचाऱ्यांची वर्तवणूक, इंटरनेट सुविधा, वायफाय, रेस्टॉरंट, एटीएम, मनी एक्स्चेंज आदींसह विमानतळावरील वातावरणाची पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ दहाव्या स्थानी राहिले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला. विमानतळावरील सुविधांविषयी प्रवासी समाधानी असून, आता येथील विमानांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कनेक्टिव्हिटी महत्त्वाची
ग्राहक समाधन सर्वेक्षणात चिकलठाणा विमानतळ दहाव्या क्रमांकावर आले. विमानतळाला सर्वेक्षण समितीने भेट दिली होती. आठ दिवसांपूर्वी हा निकाल समोर आला. ही मोठी गोष्ट असली तरी येथील कनेक्टिव्हिटीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.
हे आहेत टॉप १० विमानतळे
१. रायपूर, २. उदयपूर, ३. त्रिची, ४. वडोदरा, डेहराडून, ५.गया, ६. जोधपूर,
७. मदुराई, ८. पोर्ट ब्लेअर, ९. जम्मू. १०. औरंगाबाद विमानतळ.