ग्राहकांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत, निकष काय?
By साहेबराव हिवराळे | Published: June 20, 2024 07:49 PM2024-06-20T19:49:31+5:302024-06-20T19:49:55+5:30
शहरात अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले असून, नागरिकांना प्रकल्प बसवून दिल्याची माहिती महावितरणने दिली.
छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजनेंतर्गत ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी केवळ अर्ज करणाऱ्या नागरिकांचे आरसीसी घर असावे, एवढीच अट आहे.
या उपक्रमांतर्गत १ किलो, २ किलो व ३ किलोवॅट या सिस्टीमला अनुदान दिले जात असून, ग्राहकांनी नॅशनल पोर्टल या साइटवर ऑनलाइन पद्धतीने किती वॅटचा प्रकल्प घ्यायचा आहे, या माहितीसह अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित महावितरण कार्यालयाला याची माहिती पोर्टलद्वारे येऊन पुढील कार्यवाही गुत्तेदारामार्फत होईल. शहरात अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले असून, नागरिकांना प्रकल्प बसवून दिल्याची माहिती महावितरणने दिली.
कोणाला लाभ मिळणार?
कोणत्याही वर्गातील नागरिकांना यात सहभाग घेता येईल. यासाठी नॅशनल पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पाला बसविण्यात आलेल्या प्लेटची १५ ते २० दिवसांतून एकदा स्वच्छता करावी लागेल. प्रकल्प घेतल्यास १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार रुपये व ३ किलोवॅटला ७८ हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. तीन किलोवॅटपेक्षा जास्त प्रकल्पासाठी ग्राहकांनी अर्ज केल्यास त्यालाही ७८ हजार रुपयांचे शासनाचे अनुदान आहे.
निकष काय?
बाकी कसलेही निकष नाहीत. केवळ प्रकल्प घरावर बसविण्यासाठी आरसीसीचे घर हवे. प्रकल्प बसवल्यानंतर या प्रकल्पाला दोन मीटर असणार आहेत. एका मीटरने विद्युत पुरवठा वापर कळणार असून, दुसरा मीटर महावितरण कंपनीला किती विद्युत पुरवठा प्रकल्पाद्वारे दिला, याची माहिती ग्राहकांना मिळेल.
नागरिकांनी लाभ घ्यावा...
नागरिकांचा दुहेरी फायदा आहे. घरावर बसवलेल्या प्रकल्पाने वापराव्यतिरिक्त जास्त विद्युत पुरवठा तयार केल्यास तो विद्युत पुरवठा महावितरणला बसवलेल्या मीटरद्वारे विकत देता येणार आहे. यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा.
- सुनील जाधव, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी