पंढरपुरातील तिरंगा चौकात कंटेनरच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 10:38 PM2019-07-05T22:38:47+5:302019-07-05T22:38:59+5:30
वळण घेणाऱ्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
वाळूज महानगर: वळण घेणाऱ्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पंढरपुरातील तिरंगा चौकात घडली. जीवन हिंमतराव देशमुख असे मृताचे नाव आहे. तर सोनाली गव्हाणे ही गंभीर जखमी झाली आहे.
शहरातून वाळूच्या दिशेने शुक्रवारी दुपारी कंटेनर (एनएल-०१, क्यु- २६३६) जात होता. तर कंटेनरच्या पाठीमागे जीवन हिंमतराव देशमुख (३९ रा. रांजणगाव) व त्याची नातेवाईक सोनाली मगन गव्हाणे हे दुचाकीने (एमएच-२०, डीक्यु- ७३६३) येत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास देशमुख हा कंटेनरला ओव्हरटेक करुन पंढरपूर तिरंगा चौकातून बजाजगरकडे वळण घेत असताना कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली.
यात दुचाकीवरील दोघे खाली पडले. कंटेनरचे एक चाक देशमुख याच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्यातील हेल्मेटचा अक्षरश: चुरा झाला. जीवन देशमुखचा जागीच मृत्यू झाला. सोनाली गंभीर जखमी झाली. नागरिकांनी खाजगी रिक्षाने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून देशमुख यास मृत घोषित केले. दरम्यान मारहाणीच्या भितीने कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. वाहतूक पोलिसांनी कंटेनर व क्लिनरला ताब्यात घेत वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन केले.