दूषित पाण्यामुळे सहजीवन कॉलनीवासीयांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:47+5:302021-07-10T04:04:47+5:30
औरंगाबाद : समर्थनगरातील सहजीवन कॉलनीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी कॉलनीवासीयांनी मनपा आयुक्ताकडे गाऱ्हाणे ...
औरंगाबाद : समर्थनगरातील सहजीवन कॉलनीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी कॉलनीवासीयांनी मनपा आयुक्ताकडे गाऱ्हाणे मांडूनही प्रश्न निकाली निघालेला नाही. यामुळे हा प्रश्न सुटणार तरी कधी, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
मार्चपासून नागरिक पाठपुरावा करीत असूनही त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. कोरोनामुळे शहरात भीतीचे वातावरण होते. त्यातही कॉलनीत येणाऱ्या जलवाहिनीला कुठेतरी गळती लागली असून, त्यातून दूषित पाणी मिळत असल्याने सुरुवातीला ड्रेनेजची दुर्गंधी असलेला पाणीपुरवठा होत असून, पाणी पिण्यायोग्य नाही आणि साठवणीयोग्यही नाही. अस्वच्छ पाण्यामुळे गंभीर आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती वृद्धांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्वतंत्र जलवाहिनी टाकून मुबलक पाणीपुरवठा देण्याची मागणी मनपा आयुक्ताकडे भाग्यश्री मेढेकर, तसेच काशिनाथ जोशी, आशा लोखंडे, संदीप देशपांडे, विश्वास कुलकर्णी, सुहासिनी बोरीकर, सत्यनारायण क्षेत्रीय, पंडितराव कुलकर्णी, सुलोचना चौधरी, शिरीष तांबे, राजेंद्र मुदखेडकर, वसंत मेढेकर सरोज पेडगावकर आदी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
कॅप्शन...
नळाला असे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने, सहजीवन कॉलनीतील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.