रोजंदारी कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:38 PM2019-01-15T18:38:18+5:302019-01-15T18:38:48+5:30
महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून २०४ कर्मचाºयांनी आपल्या कुटुंबियांसह मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून २०४ कर्मचाºयांनी आपल्या कुटुंबियांसह मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. सकाळीच महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलन सोडण्याची विनंती केली. परंतु आयुक्त आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाºयांनी घेतल्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही.
महानगरपालिकेमध्ये २० ते २५ वर्षांपासून २०४ कर्मचारी रोजंदारीवर काम करीत आहेत. त्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्याबद्दल १९ जुलै १९९९ मध्ये प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर नऊ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मनपातील रिक्त जागांवर या कर्मचाºयांना सामावून घेण्याचा प्रस्ताव अलीकडेच ११ जुलै २०१८ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. अद्याप त्यावरही कार्यवाही करण्यात आली नाही.
मनपाच्या आस्थापनेवर वर्ग- ३ आणि वर्ग- ४ मध्ये ७०० पदे रिक्त आहेत. या जागांवर रोजंदारी कर्मचाºयांना सामावून घ्यावे, अशी मागणी आहे. सोमवारपासून कामगार शक्ती संघटनेच्या माध्यमाने कर्मचाºयांनी मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरूकेले. सायंकाळपर्यंत आयुक्त आंदोलनाकडे गेले नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी गौतम खरात, गौतम लांडगे यांची उपस्थिती होती. नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी पाठिंबा दिला.