नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:58 AM2018-05-16T00:58:35+5:302018-05-16T00:59:04+5:30
मान्सूनपूर्व तयारीमध्ये सर्व विभागांनी आपल्या कार्यालयांमध्ये २४ तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू ठेवावा. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मान्सूनपूर्व तयारीमध्ये सर्व विभागांनी आपल्या कार्यालयांमध्ये २४ तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू ठेवावा. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीची बैठक घेण्यात आली. यावेळी पैठणचे तहसीलदार महेश सावंत, जायकवाडी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अजेय चौधरी, पोलीस, नगरपालिका, आरोग्य, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करताना सर्वांगीण बाबींचा विचार करून आराखडे अद्ययावत करावेत. संभाव्य पूरस्थितीमुळे बाधित होणाºया गावांबाबत दक्ष राहावे. वेळीच करावयाच्या उपाययोजना यासाठी सतर्क असावे. प्रत्येक विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या नोडल अधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत दक्ष राहून कामे बिनचूकपणे पार पाडावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांसह, आवश्यक त्या ठिकाणांची पाहणी करून कार्यवाही पार पाडावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ डागडुजी करावी.
आरोग्य विभागाने औषधींच्या साठ्यासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. पोलीस यंत्रणेने आपत्ती काळात आवश्यक असणाºया बाबी, जलतरणपटूंची यादी अद्ययावत करून जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक त्या कार्यवाहीसह पाठवावी.
महावितरणने आपत्ती काळामध्ये येणाºया अडचणी, विजेचा धोका लक्षात घेऊन नियंत्रण कक्षासह आवश्यक अधिकाºयांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील धरणांबाबत दैनंदिनरीत्या अहवाल पाठवावा, तसेच आवश्यक असणारी कार्यवाही तात्काळ पार पाडावी, अशा सूचना शेळके यांनी बैठकीत दिल्या.