नाफेड तूर खरेदी केंद्र १५ मार्चपर्यंत सुरू ठेवा!
By Admin | Published: February 21, 2017 11:58 PM2017-02-21T23:58:03+5:302017-02-22T00:04:31+5:30
जालना :शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद् १५ मार्चपर्यंत सुरु ठेवावे, अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक नीलिमा केरकेट्टा यांना केल्या आहेत.
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, १५ मार्चपर्यंत हे केंद्र सुरु ठेवावे, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक नीलिमा केरकेट्टा यांना केल्या आहेत.
सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडने सुरु केलेल्या हमीभाव केंद्रात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. तुरीचे मोजमाप करण्यास सर्व्हेअर कमी असल्याने वेळ लागत आहे. त्यामुळे तुरीचे वजन करण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत आहे.
सध्या जवळपास ३५ हजार क्विंटल तुरीची आवक झालेली आहे. त्यामुळे कृषी व पणन विभागाने हमीभाव केंद्राची मुदत वाढवून १५ मार्चपर्यंत सुरु ठेवावेत. तरीही शेतकऱ्यांची गर्दी कमी झाली नाही तर केंद्र १५ मार्चनंतरही सुरु ठेवावे,
अशा सूचना त्यांनी पत्राद्वारे केलेल्या आहेत. (प्रतिनिधी)