बिले देण्याच्या अटीवर कंत्राटदारांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 09:13 PM2019-01-27T21:13:22+5:302019-01-27T21:14:19+5:30
मनपा अधिका-यांनी लवकरात लवकर थकीत बिले देण्याचे आश्वासन दिल्यावर एका कंत्राटदाराने काम सुरू केले. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम संपले.
औरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांनी २१ जानेवारीपासून विविध दुरुस्तीच्या कामांवर बहिष्कार घातला होता. शुक्रवारी सकाळी पुंडलिकनगर भागात व्हॉल्व्ह खराब झाला होता. एकही कंत्राटदार दुरुस्तीच्या कामावर येण्यास तयार नव्हता. अखेर मनपा अधिका-यांनी लवकरात लवकर थकीत बिले देण्याचे आश्वासन दिल्यावर एका कंत्राटदाराने काम सुरू केले. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम संपले.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोजकेच १० ते ११ कंत्राटदार काम करतात. जायकवाडी आणि शहरातील पाणीपुरवठ्याची सर्व कामे हेच कंत्राटदार करतात. नवीन जलवाहिन्या टाकणे, दूषित पाण्याचा प्रश्न सोडविणे आदी सर्व कामे याच कंत्राटदारांकडून करण्यात येतात. जायकवाडी ते शहरापर्यंत कुठेही जलवाहिनी फुटल्यास कंत्राटदार वेळ काळ न पाहता लेबर घेऊन घटनास्थळी धाव घेतात. मनपा अधिकारी येईपर्यंत युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात येते.
मागील आठ ते दहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला दुरुस्तीच्या कामाचे बिल मिळाले नाही. सर्व कंत्राटदारांनी २१ जानेवारीपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी जायकवाडीत जुन्या पाणीपुरवठा योजनेत बिघाड झाला. हे काम करण्यासाठी मनपाला खाजगी कंत्राटदाराला पाचारण करावे लागले. हे काम करीत असताना कंत्राटदाराचा कर्मचारी वर्गीस हा गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला तब्बल १८ टाके पडले आहेत. जोखमीचे काम करणाºयांना तरी वेळेवर बिले मिळावीत, अशी अपेक्षा कंत्राटदारांनी व्यक्त केली.