कंत्राटदार बदलले; तरीही संथगती; औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम ४ वर्षापासून रखडलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:41 PM2022-06-20T17:41:58+5:302022-06-20T17:45:09+5:30
चार वर्षांपासून सुरू आहे काम : जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करूनही गती वाढेना
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन चार वर्षांचा काळ लोटला आहे. अजूनही त्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
आंध्र प्रदेशाच्या ऋत्विक एजन्सी या कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम सोडून दिल्यानंतर दुसरे तीन कंत्राटदार या कामासाठी नेमले. रस्त्याचे काम सुरू होऊन ४ वर्ष झाली आहेत. अजून २० टक्के तरी काम बाकी आहे. परिणामी, पर्यटक, नागरिक, प्रशासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांसह एसटी महामंडळाला त्या रस्त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना व अपघातांना कोण जबाबदार राहणार असा प्रश्न आहे. ऋत्विक एजन्सीने साहित्य सोडून येथून काढता पाय घेतल्यानंतर रावसाहेब चव्हाण, आणि कामटे व अन्य एक अशा तीन कंत्राटदारांकडे काम वर्ग केले होते. कंत्राटदार बदलले; तरीही काम अजून शिल्लक आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मध्यंतरी रस्त्याच्या कामाची पाहणी करून गती वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.
१ हजार कोटींचा आहे प्रकल्प
पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली होती. पूर्वी ३०० कोटींच्या आसपास कंत्राट होते. त्यात ७०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद केली. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता काँक्रिटीकरणातून करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये आणखी काही वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.