कंत्राटदारांनी आणले ‘विघ्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:09 AM2018-09-16T00:09:34+5:302018-09-16T00:10:00+5:30
महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.
लेखा विभागाकडे ११५ कोटी रुपयांची बिले सध्या थकली आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये आणखी ५५ ते ६० कोटींची बिले थकली आहेत. लवकरच ही बिलेही लेखा विभागात येऊन धडकणार आहेत. थकबाकीचा आकडा दीडशे कोटींपर्यंत जाईल. विकास कामांची बिले देण्याचे कोणतेच नियोजन प्रशासन, लेखा विभागाने केलेले नाही. ज्येष्ठता यादीनुसार बिले देण्यात येणार असल्याचे वारंवार कंत्राटदारांना सांगण्यात येत आहे. मनपा खरोखरच ज्येष्ठता यादीनुसार बिले देणार असेल, तर ज्यांची बिले दीड ते दोन वर्षांपासून थकीत आहेत, त्यांना आजपर्यंत पैसे का मिळाले नाहीत, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. विकासकामे करण्यासाठी कंत्राटदारांनी खिशातील पैसा लावला आहे. आता जेव्हा पैसे देण्याची वेळ आल्यावर प्रशासन हात वर करीत आहे. त्यामुळे शनिवारी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बंडू कांबळे व इतर सदस्यांनी मुख्य लेखाधिकारी केंद्रे यांना घेराव घातला. केंद्रे यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
अत्यावश्यक सेवांची कामे बंद
पथदिवे, पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. या दोन्ही सेवांशी निगडित कंत्राटदारांनी बंडाचा झेंडा रोवला. शनिवारी विद्युत, पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी कामे बंद करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत नवीन कामे करणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. शनिवारी सायंकाळी संस्थान गणपती येथे काही लाईट लावायचे होते. कंत्राटदारांनी कामे करण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रशासन अधिक संकटात सापडले आहे.