थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:55 PM2019-05-20T23:55:13+5:302019-05-20T23:55:57+5:30
औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली ...
औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली नाहीत तर पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक कामेही थांबविण्यात येतील, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. उपोषणात अनेक रोजेदार बांधवांचाही समावेश आहे.
महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वाधिक फटका विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. तिजोरीत सध्या खडखडाट असल्यामुळे ठेकेदारांची जवळपास ३०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. उधारीवर साहित्य आणून कंत्राटदारांनी विकासकामे केली आहेत. थकीत बिले मिळावीत यासाठी एक वर्षापासून कंत्राटदार पाठपुरावा करीत आहेत. तिजोरीत पैसे नसल्यामुळे कंत्राटदारांच्या पदरी केवळ आश्वासने पडत आहेत. कंत्राटदारांनी आयुक्त, महापौरांना घेराव, मनपा मुख्यालयासमोर निदर्शने, उपोषण अशा प्रकारे अनेक वेळा आंदोलने केली. तरीही बिले न मिळाल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत. सोमवारपासून या ठेकेदारांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु पहिल्या दिवशी प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे सोमवारी मनपा मुख्यालयात आले; परंतु त्यांनी ठेकेदारांची भेट घेतली नाही. त्यामुळे ठेकेदार आणखी संतप्त झाले आहेत. आता दोन दिवसांत बिले मिळाली नाही तर विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामेही बंद करण्यात येतील, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.
विकासकामे ठप्प
थकीत बिले मिळत नसल्यामुळे बहुसंख्य कंत्राटदारांनी पालिकेच्या कामांवर याआधीच अघोषित बहिष्कार टाकला आहे. विकासकामांच्या वारंवार निविदा मागवूनही ठेकेदार पुढे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे किती तरी विकासकामे रखडली आहेत. आतापर्यंत विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामे सुरू आहेत. मात्र, आता तीही बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.
आयुक्तांचे खाजगीत फोन
वॉर्डांमधील विकासकामे ठप्प झाल्याने नगरसेवक थेट आयुक्तांकडे कामांसाठी तगादा लावत आहेत. आयुक्त ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत, त्यांना काम सुरू करा म्हणून खाजगीत फोन करीत आहेत. कंत्राटदारांना २ लाख रुपये देतो, काम करा असे आश्वासन देत आहेत. यानंतरही कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत.
-----------------