मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 07:19 PM2019-02-28T19:19:51+5:302019-02-28T19:20:05+5:30
: शहरात केलेल्या विविध कामांची बिले मिळावीत, या मागणीसाठी ठेकेदारांनी मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबाद : शहरात केलेल्या विविध कामांची बिले मिळावीत, या मागणीसाठी ठेकेदारांनी मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. ही माहिती मिळताच डी. पी. कुलकर्णी यांनी ठेकेदारांची भेट घेतली. मनपा आयुक्त शहरात नसल्याचे सांगून त्यांनी थकीत बिले देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन मागे घेतले.
थकीत बिले मिळावी म्हणून ठेकेदारांनी सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी बारा वाजता सर्व ठेकेदार मनपा आयुक्तांच्या दालनासमोर एकत्र आले. जोपर्यंत बिले मिळणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा घेत ठेकेदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी प्रभारी मुख्यलेखाधिकारी महावीर पाटणी यांनी त्यांची भेट घेऊन आश्वासन दिले; परंतु त्यांनी माघार घेतली नाही. दुपारी दीड वाजेच्या सुमारास उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांनी ठेकेदारांची भेट घेतली. बिले मिळत नसल्याने अनेकांचे देणे राहिले आहे. घरी जाता येत नाही, अशी समस्या ठेकेदारांनी त्यांच्यासमोर मांडली. मनपा आयुक्त शहरात नाही. ते दिल्लीला गेलेले आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
अन्यथा पुन्हा आंदोलन
उपायुक्तांनी आयुक्तांशी चर्चा करून दोन दिवसांत बिले देण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवसांत बिले मिळाले नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल,असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.