देशाच्या विकासात जैन समाजाचे योगदान; यंदाच्या महावीर जयंतीचा शोभायात्रेची संकल्पना
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 2, 2023 09:01 PM2023-04-02T21:01:11+5:302023-04-02T21:01:20+5:30
सजीव, निर्जीव देखाव्यावर भर : २० साधू-साध्वीजीं होणार सहभागी
छत्रपती संभाजीनगर : सकल जैन समाज एकत्र येऊन एकजुटीने, जल्लोषात भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाची शोभायात्रा काढतात. ही छत्रपती संभाजीनगरची ख्याती संपूर्ण देशात पसरली आहे. यामुळेच मंगळवारी ४ एप्रिल निघणाऱ्या शोभायात्रा पाहण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी शहरात २० साधू-साध्वीजी येत आहेत. ‘आम्हाला जैन धर्माचा अभिमान आहे’ या संकल्पनेवर आधारित यंदा शोभायात्रा निघणार आहे. त्यात देशाच्या विकासात जैन समाजाचे योगदानावर प्रकाशझोत टाकणारे सजीव व निर्जीव देखावे असणार आहेत.
यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश मुथा यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ६ वाजता शहरातील विविध भागांतून तसेच पंढरपूर येथून वाहन रॅली काढण्यात येणार आहे. सर्व वाहनरॅली महावीर स्तंभ येथे पोहोचणार आहे. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता धर्म ध्वजारोहण होणार आहे. यावेळी कार्याध्यक्ष सुभाष झांबड व सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष, महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर ७.३० वाजता उस्मानपुरातील उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालय व गुरुगणेशनगर येथे धर्मध्वजारोहण होईल.
सकाळी ८ वाजता पैठणगेट येथून मुख्य शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी जैन समाजातील २० साधू-साध्वीजींचे मार्गदर्शन व मांगलिक होईल. शोभायात्रा टिळकपथ, गुलमंडी, मछलीखडक, सिटीचौक, सराफारोडमार्गे शहागंजचौकात पोहोचले व सांगता होईल, या शोभायात्रेत सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे महासचिव रवि लोढा यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष नीलेश पहाडे, कोषाध्यक्ष राहुल साहुजी, संयोजक अजित चंडालिया, अमोल मोगले, कविता अजमेरा, मनीषा भन्साली, भारती बागरेचा, उपाध्यक्ष ललित पाटणी, सुधीर साहुजी, दिगंबर क्षीरसागर, विलास साहुजी, संजय संचेती, विनोद बोकडिया आदीं पदाधिकारी हजर होते.
मंगळवारी शोभायात्रा
- सकाळी ६ वा. विविध भागांतून वाहन रॅली.
- सकाळी ७ वा. धर्मध्वजारोहण, महावीर स्तंभ चौक.
- सकाळी ७.१५ वा. धर्मध्वजारोहण उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालय
- सकाळी ७.३० वा. धर्मध्वजारोहण गुरुगणेशनगर.
- सकाळी ८ वा. मुख्य शोभायात्रा, पैठणगेट येथून.