९ एकर जमिनीचा ताबा

By Admin | Published: November 28, 2015 12:46 AM2015-11-28T00:46:31+5:302015-11-28T00:47:56+5:30

औरंगाबाद : छप्पन्न वर्षांपासून वन विभागाच्या ताब्यात असलेली हिमायतबाग परिसरातील तब्बल ९ एकर २७ गुंठे जमीन शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाने परत घेतली.

Control of 9 acres of land | ९ एकर जमिनीचा ताबा

९ एकर जमिनीचा ताबा

googlenewsNext




औरंगाबाद : छप्पन्न वर्षांपासून वन विभागाच्या ताब्यात असलेली हिमायतबाग परिसरातील तब्बल ९ एकर २७ गुंठे जमीन शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाने परत घेतली. मनपाने १९५९ साली ही जमीन वार्षिक पाच रुपये दराने वन विभागाला पन्नास वर्षांसाठी लीजवर दिली होती. लीजची मुदत सहा वर्षांपूर्वीच संपली. त्यामुळे मनपा प्रशासनाने वन विभागाकडे पाठपुरावा करून अखेर आज या जमिनीचा एकतर्फी ताबा घेतला.
उद्धवराव पाटील चौकापासून आत हिमायतबागेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही जमीन आहे. तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने १९५९ साली ही जमीन वन विभागाला पन्नास वर्षांच्या लीजवर दिली होती. वन विभागाने या जमिनीवर नर्सरी उभारलेली असून, कर्मचाऱ्यांसाठी काही निवासस्थानेही बांधलेली आहेत. आतापर्यंत मनपाला वर्षाकाठी पाच रुपये दराने या जमिनीचे भाडे मिळत होते. लीजची मुदत २००९ साली संपली; परंतु अजूनही ही जमीन वन विभागाच्याच ताब्यात होती. ही बाब काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर मनपा प्रशासनाने या जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार मनपाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हिमायतबाग येथे जाऊन या जमिनीचा एकतर्फी ताबा घेतला. यावेळी उपायुक्त आय्युब खान, मालमत्ता अधिकारी वसंत निकम आदी हजर होते.
महापौरांकडून पाहणी
मनपाने जमिनीचा ताबा घेतल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांनी दुपारी या जमिनीची पाहणी केली. त्यांच्या सोबत उपायुक्त आयुब खान, मालमत्ता अधिकारी वसंत निकम हेही होते. या जमिनीच्या एका भागात काही प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची सूचना महापौर तुपे यांनी केली. सर्व बाबी तपासून तसेच या जमिनीचे आरक्षण पाहून जमिनीच्या वापराविषयी निर्णय घेतला जाईल, असे महापौर तुपे यांनी सांगितले.
खोकडपुरा भागात सामाजिक न्याय भवनशेजारी रस्त्यालगत अतिक्रमण करून दुकाने थाटण्याचा प्रयत्न शुक्रवारी महानगरपालिकेच्या पथकाने हाणून पाडला. दुकानांसाठी फुटपाथवर ठोकलेले अँगल उखडून फेकण्यात आले. या ठिकाणी शेडची तब्बल १२ दुकाने थाटण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात होता.
४सामाजिक न्याय भवनची संरक्षक भिंत आणि फुटपाथ यामध्ये दोन तीन फुटांचे अंतर आहे. नेमकी हीच जागा हेरून काही जणांनी या भिंतीशेजारी मोकळ्या जागेवर फुटपाथवर सुमारे २०० फूट दूर अंतरापर्यंत शेडची दुकाने उभारण्याचे काम सुरू केले होते. त्यासाठी चार दिवसांपासून अँगल ठोकण्यात येत होते. अँगलचा संपूर्ण सांगाडा उभाही करण्यात आला होता. त्याच वेळी काही सुज्ञ नागरिकांनी मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली.
४केंद्रेकर यांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांवर याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मनपाचे पथक आज दुपारी खोकडपुरा भागात धडकले. पथकाने दुकानांसाठी ठोकण्यात आलेले अँगल जेसीबीच्या साह्याने उखडून फेकून जप्त केले. ही कारवाई करताना कोणाकडूनही विरोध झाला नाही. मनपाचे उपायुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी अजमत खान, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मनपाच्या पथकाने शुक्रवारी गुलमंडीवरही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या ठिकाणी रस्त्यालगत अतिक्रमण करून उभारलेली दुकाने हटविण्यात आली. जेसीबीच्या साह्याने तीन तास कारवाई करून ही दुकाने भुईसपाट करण्यात आली. मनपाचे उपायुक्त रवींद्र निकम यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. दहा वर्षांपूर्वी याठिकाणी १५ मीटर रस्त्यासाठी भूसंपादनाची कारवाई करून संबंधित जमीन मालकाला त्याचा मोबदलाही देण्यात आला होता.
येथे गट्टाणी बिल्ंिडगसमोर बेकायदेशीररीत्या सहा दुकाने उभारण्यात आली होती. ही दुकाने मनपाने रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीवर होती. त्याविषयी काही नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने आज सकाळी ११ वाजता मनपाचे अतिक्रमण हटाव पथक गुलमंडीवर पोहोचले. जोडीला पोलिसांचा मोठा फौजफाटाही होता. पथकातील कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत कारवाई करून हे अतिक्रमण हटविले. मनपाचे उपायुक्त रवींद्र निकम, प्रशासकीय अधिकारी महावीर पाटणी हे यावेळी स्वत: उपस्थित होते.

Web Title: Control of 9 acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.