‘आरएसएस’सोबत वैचारिक मतभेद कायम : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:44 AM2018-05-09T00:44:40+5:302018-05-09T00:45:50+5:30
‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.
एका संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आठवले मंगळवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. लंडन येथे बाबासाहेबांचे स्मारक केले; परंतु काँग्रेस राज्यकर्त्यांना बाबासाहेबांचा विसर पडला होता. दलित अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता आठवले म्हणाले, दलितांवर अत्याचार होत आहेत, ही गंभीर बाब आहे. याला ज्या प्रमाणे सरकार जबाबदार आहे, तेवढेच सर्व समाजही जबाबदार आहेत. अत्याचाराचे गुन्हे नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी तैनात केले पाहिजेत.
सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील. त्यामुळे राहुल गांधींचा प्रश्नच येत नाही. सत्ता पाहिजे असेल, तर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी आपसातील वाद मिटवून आगामी निवडणुकांमध्ये युती केली पाहिजे. हे दोघे सोबत येत नसतील, तर रिपाइं भाजपसोबत राहील. कर्नाटक निवडणुकीत रिपाइं १९४ मतदारसंघांत भाजपसोबत आहे.
दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगोदर आपण याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलो होतो. सेना-भाजप युती झाली, तर आपण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत. युती नाही झाली, तर विदर्भातील रामटेक मतदारसंघातून प्रयत्न करू, असेही रामदास आठवले म्हणाले.
यावेळी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, किशोर थोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, सिद्धार्थ दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आंबेडकरवादाला नक्षलवाद मान्य नाही
रामदास आठवले म्हणाले, आंबेडकरवाद हा नक्षलवाद मान्य करीत नाही. सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता नक्षलवादी असूच शकत नाही; मात्र बाबासाहेबांचे नाव घेत नक्षलवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कमी नाही. पोलिसांनी नक्षलवादी चळवळीच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत.
ऐक्याच्या बाजूने सातत्याने मी एकटाच बोलत आहे. ऐक्य झाले तर ते वैचारिक मुद्यांवर व्हावे, भावनिक ऐक्य दीर्घकाळ टिकणारे नाही.
एकजातीय ऐक्य राजकीय फायद्याचे नाही. ऐक्यामध्ये सर्वच समाजाचे प्रतिनिधित्व असावे.