बीड येथील वादग्रस्त परीक्षा केंद्र बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:59 PM2018-10-29T22:59:10+5:302018-10-29T22:59:37+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे बीड आणि जालना येथील केंद्र ऐनवेळी बदलण्यात आले होते. हे केंद्र बदलण्यासाठी सल्लागार समितीने शिफारस केल्याचा दावा परीक्षा संचालकांनी केला. मात्र सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी सोमवारी पत्र देऊन बीड येथील वादग्रस्त केंद्राची शिफारस केलीच नव्हती, असा पवित्रा घेत पूर्ववत केंद्र करण्याची मागणी केली. त्यानुसार केंद्र बदलण्यात आले आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे बीड आणि जालना येथील केंद्र ऐनवेळी बदलण्यात आले होते. हे केंद्र बदलण्यासाठी सल्लागार समितीने शिफारस केल्याचा दावा परीक्षा संचालकांनी केला. मात्र सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी सोमवारी पत्र देऊन बीड येथील वादग्रस्त केंद्राची शिफारस केलीच नव्हती, असा पवित्रा घेत पूर्ववत केंद्र करण्याची मागणी केली. त्यानुसार केंद्र बदलण्यात आले आहे.
बीड आणि जालना येथील वादग्रस्त परीक्षा केंद्रावर एमबीएची परीक्षा घेण्याचे शनिवारी घोषित केले. हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांनी हा प्रकाराशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करून सांगितले की, बीड येथील परीक्षा केंद्र बदलण्यासाठी समितीने सांगितले नव्हते. परीक्षा केंद्राबाबत सर्व निर्णय समिती अध्यक्षांसह सदस्य डॉ. नवनाथ आघाव, डॉ. मजहर फारुकी आणि डॉ. गोविंद काळे हे घेतात. दोन केंद्र बदलण्याच्या प्रस्तावावर ऐनवेळी सह्या घेतल्या. हा निर्णय परीक्षा संचालकांनी घेतलेला आहे. त्याचे खापर समितीवर फोडणे योग्य नाही. यासाठी बीड येथील वादग्रस्त आदित्य एमबीए हे केंद्र बदलून इतर ठिकाणी देण्याची मागणी कुलगुरूंकडे केल्याचे डॉ. अंभोरे यांनी स्पष्ट केले. यानुसार परीक्षा केंद्रात पुन्हा बदल केला आहे. या बदलानुसार बीड येथील आदित्य एमबीए महाविद्यालयातील विद्यार्थी तुळशी महाविद्यालय आयटी आणि एमआयआयटी महाविद्यालयात हलविण्यात आले आहेत.
वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच; त्यात कोणताही बदल नाही
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. त्यात कोणताही बदल केलेला नाही. यात एम.कॉम., एम.बी.ए., आणि एम.सी.ए. या अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. २०१५ च्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होत आहेत. याशिवाय एम.ए., एम.एस्सी. अभ्यासक्रमांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे संचालक डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
पैसे घेऊन बदलतात केंद्र
परीक्षांचे केंद्र पैसे घेऊन बदलतात, असा थेट आरोप पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. विद्यापीठ कायद्यात परीक्षा मंडळाच्या बैठकीत निमंत्रित सदस्य बोलावण्याची तरतूद नाही. तेव्हा कुलगुरू कोणत्या नियमानुसार काही लोकांना निमंत्रित करतात. पैसे घेऊन केंद्र वाटणारांची यादीही आपल्याकडे असून, योग्य वेळी नावे जाहीर करू, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.