निवडणूकीत वादाला सुरुवात; महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने व्यावसायिकाचे दालन फोडले
By सुमित डोळे | Published: April 30, 2024 11:56 AM2024-04-30T11:56:28+5:302024-04-30T11:57:13+5:30
दुचाकीस्वारांनी घर जाळण्याची धमकी दिल्याचा व्यावसायिकाचा आरोप
छत्रपती संभाजीनगर : पतंग चिन्हाला समर्थन न देता महाविकास आघाडीला समर्थन देऊन घरी बैठका घेतल्याच्या रागातून व्यावसायिक जफर अली हैदर अली मर्चंट यांच्या पत्नीच्या दुकानावर अज्ञातांनी दगडफेक केली. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता ही घटना घडली. दुचाकीस्वार दगडफेक करणाऱ्यांनी तोंड बांधलेले होते, अशी माहिती जफर अली यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील निवडणूक प्रचारातील राजकीय वाद पेट घेत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
जफर अली (रा. एसटी कॉलनी, फाजलपुरा) हे कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक असून सिटी डेव्हलपमेंट फोरम नावाची संस्था चालवतात. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या जफर सध्या राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहे. संस्थेच्या भागीदारांसह त्यांनी महाविकास आघाडीला समर्थन दिले असून त्याअनुषंगाने सातत्याने त्यांच्या फाजलपुऱ्यातील घरी बैठका होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यकर्ते, समर्थकांची बैठक घेतली होती. जफर अली यांच्या निवासस्थानाला लागूनच त्यांच्या पत्नीचे कपड्यांचे मोठे दालन आहे. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास पत्नी दालनात असताना अचानक दगडफेक झाली. दुकानाच्या समोरील सजावटीच्या काचांची तोडफोड करून दुचाकीस्वार टवाळखोरांनी आरडाओरड केली. 'आज दुकानावर दगड फेकले आहेत, पुढे घर जाळू' अशी धमकी दिल्याचा दावाही मर्चंट यांनी केला आहे. रात्री उशिरा ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले होते.
तोंड बांधलेले होते
जफर अली यांच्या दाव्यानुसार, दगडफेक दुचाकीस्वारांनी तोंड बांधलेले होते. घटना घडली तेव्हा ते दुकानात नव्हते. मात्र, त्यांनी महाविकास आघाडीला समर्थन थांबवून पतंगासाठी काम करण्यासाठी धमकावल्याचा आरोप केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली, हे विशेष.