माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला

By राम शिनगारे | Published: March 4, 2024 11:27 AM2024-03-04T11:27:28+5:302024-03-04T11:27:58+5:30

नातेवाईकांच्या बैठकीत वाद झाल्याने सासऱ्याने जावयाला हाकलून दिले, त्यानंतर रागात जावयाने केले धक्कादायक कृत्य

Controversy erupted while bringing back his estranged wife; The son-in-law killed the father-in-law in anger | माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला

माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला

छत्रपती संभाजीनगर : वादामुळे माहेरी निघून गेलेल्या पत्नीला पुन्हा घरी नेण्यासाठी आलेल्या जावयाचा सासऱ्यासोबत वाद झाला. संतप्त जावयाने चाकूने भोसकून सासऱ्याचा खून केल्याची घटना शनिवारी (दि. २) रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदवून जावयास अटक केली.

दत्ता रामराव पाटोळे (वय ३६, रा. पिरबावडी, ता. फुलंब्री) असे आरोपीचे, तर सूर्यभान फकीरचंद रिठे (५२, रा. धनगर गल्ली, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे. आरोपीचा मेहुणा योगेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दत्ता पाटोळे हा पत्नी सुनीता हिला सतत त्रास देत होता. मारहाण करीत होता. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे सुनीताचे वडील सूर्यभान यांनी तिला माहेरी आणले होते. 

मागील दीड महिन्यापासून सुनीता माहेरीच राहत होती. त्यामुळे दत्ताने नातेवाइकांच्या मध्यस्थीने पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी शनिवारी सासऱ्याचे चिकलठाणा येथील घर गाठले. त्याठिकाणी नातेवाइकांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत सासरा व जावयामध्ये वाद झाला. वाद शिवीगाळीपर्यंत पाेहोचला. शेवटी सासऱ्याने जावयास घराबाहेर हाकलून दिले. हा अपमान सहन न झाल्याने त्याने रागाच्या भरात सासऱ्याच्या पोटात चाकूने सपासप वार केले. त्यात सूर्यभान हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असतानाच सासऱ्याची प्राणज्योत मालवली. मेहुण्याने दिलेल्या तक्रारीवरून दत्ता पाटोळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. पोलिस निरीक्षक गौतम पातारे अधिक तपास करीत आहेत.

आरोपी जावई बसचालक
आरोपी जावई हा खासगी बसवर चालक म्हणून काम करीत होता. त्यास दोन मुले आहेत. सासऱ्याचा खून केल्यानंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता, ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Controversy erupted while bringing back his estranged wife; The son-in-law killed the father-in-law in anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.